सांगली : जिल्ह्यात उष्णलहरींनी ठाण मांडले असून, पारा ४२ अंशांवर गेल्याने नागरिकांना असह्य झळांचा सामना करावा लागला. किमान तापमानातही मोठी वाढ झाली असून, पारा २३ अंशावर पोहोचला आहे. येत्या दोन दिवसात पारा अंशाने कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.रविवारी दिवसभर उन्हाच्या तीव्र झळांचे अस्तित्व जिल्हाभर जाणवत होते. शहरासह जिल्ह्याच्या प्रमुख मार्गावर दुपारी अघोषित संचारबंदीसारखे चित्र दिसत होते. छत्री, टोपी यांचा वापर करून नागरिकांना दुपारी घराबाहेर पडावे लागत होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाचा आलेख वाढतच आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कमी तापमान राहिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता, मात्र दुसऱ्या पंधरवड्यात पुन्हा तीव्र उन्हाने छळण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या सहा दिवसांत तापमानात अंशाने घट होणार असून, जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.दुसरीकडे किमान तापमानात झालेली वाढ कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. आगामी आठवडाभर जिल्ह्यातील सरासरी किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या घरात राहणार आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडा असह्य ठरण्याची चिन्हे आहेत.लहरींचे अस्तित्व : दोन दिवसांचेहवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार उष्णलहरींचा सामना रविवारी मराठवाडा व मध्य महाराष्टÑातील काही जिल्ह्यांना बसला आहे. सोमवारीही काही प्रमाणात उष्णलहरींचा सामना या जिल्ह्यांना करावा लागण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आता सतर्कता बाळगावी लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी आठवडाभर जिल्ह्याच्या कोणत्याही भागात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे उकाड्यास सामोरे जावे लागणार आहे. सरासरी तापमानापेक्षा ५ अंशाने सध्या तापमान जास्त आहे, तर किमान तापमान सरासरीपेक्षा अंशाने जास्त आहे.
सांगलीचे तापमान ४२ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:24 PM