सांगली : चोरटे केवळ रोख रक्कम किंवा मुद्देमाल चोरत असल्याच्या अनेक घटना घडत असतात; मात्र आता महाग झालेल्या खाद्यतेलावरही चोरट्यांनी डल्ला मारला. शहरातील वखारभाग येथील दुकान फोडून चोरट्यांनी रोख साडेआठशे रुपयांसह शेंगतेलाचा डबाही लंपास केला. याप्रकरणी सुरेश आण्णासाहेब पाटील (रा. वखारभाग) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहरातील वखारभाग परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन दुकानात चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात फिर्यादी पाटील यांचे वखारभागात नेमिनाथ ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत रोख साडेआठशे रुपये घेतले याशिवाय जाताना अडीच हजार रुपये किमतीचा शेंगतेलाचा डबाही घेऊन चाेरटा पसार झाला. गुुुरुवारी सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पाटील यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
दुसऱ्या घटनेत याच परिसरात असलेले विलास चतुरलाल शहा (रा. उत्तर शिवाजीनगर,सांगली) यांचे शहा पाटील ॲण्ड कंपनी या पशुखाद्याचे दुकानाचे दार उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत रोख रकमेसह गोदामाच्या किल्ल्या, कागदपत्रे असा ४५०० रुपयांचा माल लंपास केला. शहा यांनीही शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. गुरुवारच्या मध्यरात्री वखारभागात एकाचवेळी अनेक दुकानात चोरीचा प्रयत्न केल्याने पोलीस सतर्क झाले आहेत.