सांगली : स्वत:चा मतदारसंघ सांभाळत पक्षाच्या राज्यातील अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी आता सांगली जिल्ह्यातील स्टार प्रचारक असलेल्या नेत्यांची कसरत सुरू आहे. पतंगराव कदम, आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांची स्टार प्रचारकाच्या भूमिकेमुळे ओढाताण होऊ लागली आहे. तरीही पक्षीय आदेशाप्रमाणे या तिन्ही नेत्यांनी प्रचारासाठी उरलेल्या उर्वरित सहा दिवसांच्या कालावधितही अन्य मतदारसंघांसाठी वेळ दिला आहे. राज्यभर प्रचारासाठी नेहमीच मागणी असलेल्या कॉँग्रेस नेत्यात पतंगराव कदम यांचा समावेश आहे. काँग्रेसकडे जिल्ह्यात अन्य दुसरा स्टार प्रचारक नाही. राष्ट्रवादीकडे राज्यासाठी स्टार प्रचारक म्हणून नेत्यांची मोठी फळी आहे. यामध्ये आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. इलियास नायकवडी, अण्णा डांगे हेसुद्धा राज्यपातळीवर प्रचारासाठी चालणारे नेते आहेत. यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी राज्यभर आपल्या भाषणाची छाप पाडली आहे. म्हणूनच आताही विधानसभा निवडणुकीसाठी या नेत्यांवर पक्षाने जबाबदारी टाकली आहे. आर. आर. पाटील यांनी मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात पाच सभांना स्टार प्रचारक म्हणून हजेरी लावली. आगामी सहा दिवसांत त्यांना पुन्हा विदर्भ आणि मराठवाडा येथील काही सभांना हजेरी लावायची आहे. यातील अकोला, लातूर याठिकाणच्या सभा निश्चित झाल्या आहेत. पतंगराव कदम यांनाही येत्या सहा दिवसात कोल्हापूर, कऱ्हाड, सासवड, हिंगोलीतील खांदेगाव, पुण्यातील फुरसुंगी येथील सभांमध्ये प्रचारक म्हणून उपस्थिती लावायची आहे. जयंत पाटील यांचेही सभेसाठी पट्टणकोडोली, टाकळी, शिरोळ, कागल याठिकाणी दौरे होणार आहेत. स्वत:चा मतदारसंघ सांभाळत त्यांना राज्यातील अन्य ठिकाणच्या सभांनाही हजेरी लावायची असल्याने त्यांची सध्या कसरत सुरू आहे. स्टार प्रचारकांच्या पक्षाच्या यादीत या तिन्ही नेत्यांची नावे आहेत. सध्या राज्यातील प्रत्येक मतदारसंघात जोरदार चुरस पाहावयास मिळत आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांना मागणी वाढली आहे. सांगली जिल्ह्यातील या तिन्ही नेत्यांनी वेळेअभावी अनेक ठिकाणच्या सभांचा बेत रद्द केला आहे. मतदारसंघ व बाहेरील प्रचार कार्यक्रम यांचा ताळमेळ साधताना त्यांची कसरत सुरू आहे. या तिन्ही नेत्यांच्या मतदारसंघात बाहेरील स्टार प्रचारकांची एकही सभा झालेली नाही. आपापल्या मतदारसंघात त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडेही त्यांनी मोठ्या नेत्यांच्या सभांची मागणी केलेली नाही. ते आता स्वत:चे बळ यानिमित्ताने आजमावत आहेत. (प्रतिनिधी)
सांगली : जिल्ह्याचे तीन नेते स्टार प्रचारकाच्या भूमिकेत
By admin | Published: October 07, 2014 10:50 PM