सांगली : भरधाव डम्परने जोराची धडक दिल्याने जेजूरी (जि. पुणे) येथील एकाच कुटूंबातील तीन ठार, तर तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमीमध्ये माय-लेकचा समावेश आहे. माहूली (ता, खानापूर) येथे सोमवारी सकाळी दहा वाजता हा अपघात झाला.सुरेश किसन देवकाते (वय ४५), त्यांची आई सुनंदा किसन देवकाते (६५), मुलगा बबलू सुरेश देवकाते (५ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. जखमीमध्ये शोभा सुरेश देवकाते (४५), मुलगी सई सुरेश देवकाते (४ वर्षे) व स्नेहलता किसन देवकाते (४०) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.देवकाते कुटूंब मूळचे सांगली जिल्ह्यातील जतचे आहे. पण जतमधील घर विकून नोकरीनिमित्त ते जेजूरी येथे स्थायिक झाले आहेत. सुरेश देवकाते हे अभियंता आहेत. ते तळेगाव-दाभाडे (जि. पुणे) येथे नोकरीस आहेत.
सोमवारी विटा येथे त्यांच्या नातेवाईकाचे लग्न होते. यासाठी हे कुटूंब जेजूरीहून मोटारीने (एमएच २० एच ११३२) विट्याला येत होते. सुरेश मोटार चालवित होते. त्यांच्या बाजूला आई सुनंदा व मुलगा बबलू बसले होता. पाठीमागील सिटवर पत्नी शोभा, मुली सई व बहिणी स्नेहलता या तिघी बसल्या होत्या.माहूली येथील बसस्थानकाजवळ आल्यानंतर समोरुन भरधाव वेगाने आलेल्या डम्परने (क्र. एमएच १० एडब्ल्यू ८१९५) जोराची धडक दिली. यामध्ये मोटारीत पुढे बसलेल्या सुरेश, त्यांची आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
सुरेश यांच्या पत्नी, मुलगी व बहिण याही गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील लोकांनी धाव घेतली. विटा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविले. अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांनी विट्याकडे धाव घेतली.मोटारीचा चक्काचूरअपघातग्रस्त मोटारीचा चक्काचूर झाला आहे. धडक देणारा डम्पर वाळूने भरलेला होता. अपघात होताच डम्परच्या चालकाने पलायन केले. पोलिसांनी अपघातग्रस्त डम्पर व मोटार जप्त केला आहे. डम्परच्या क्रमांकावरुन चालक व मालकाचा शोध सुरु आहे.