सांगली : लवणमाची (ता. वाळवा) व हजारमाची (ता. कऱ्हाड ) येथील अनुक्रमे ओमसाई ढाबा व सम्राट लॉजवर गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असलेला वेश्या व्यवसायाचा अड्डा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून उद्ध्वस्त केला. या छाप्यात वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या १४ वर्षाच्या मुलीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे.अटक केलेल्यांमध्ये ओमसाई ढाब्यावर ढाब्याचा मालक मदन संभाजी कदम (वय ३२, रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा), एजंट सुयोग उर्फ शंकर पाटील (३८, कार्वेनाका, ता. कऱ्हाड ), महिला व मुलींचा पुरवठा करणारा सनी बाबूराव काळे (२४, जामखेड, जि. अहमदनगर), ग्राहक महेश लक्ष्मण जगदाळे (२४, जगदाळे मळा, मलकापूर रस्ता, कऱ्हाड ) यांचा समावेश आहे.
सम्राट लॉजच्या कारवाईत लॉजचा व्यवस्थापक शुभम पोपट कांबळे (२०, नवेखेड, ता. वाळवा) व एजंट महेश महादेव सावंत (३८, जोशी गल्ली, आजरा, जि. कोल्हापूर) या दोघांना अटक केली आहे.
छाप्याची चाहूल लागताच लॉजचा मालक हणमंत वसंत माने (शुक्रवार पेठ, आझाद चौक, कऱ्हाड ) हा पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक सातारा जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहे.कऱ्हाड -तासगाव रस्त्यावरील ओमसाई ढाब्यावर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने दोन दिवसापूर्वी या ढाब्यावर जाऊन स्टिंग आॅपरेशन केले. याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर शुक्रवारी रात्री पथक पुन्हा या ढाब्यावर गेले.
बोगस ग्राहक पाठविण्यात आले. त्यानंतर छापा टाकण्यात आला. छाप्याची चाहूल लागताच ढाबा मालक, एजंट, दलाल व ग्राहकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडण्यात आले. १४ वर्षाची मुलगी व २२ वर्षाची तरुण सापडली. त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले आहे.
ढाब्यातील खोल्यांची तसेच काऊंटरची झडती घेतल्यानंतर संतती नियमन साधनांची १४ पाकीटे सापडली आहेत. ती जप्त केली आहेत. कऱ्हाड -ओगलेवाडी रस्त्यावर सम्राट लॉजमध्येही पथकाने बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला. या छाप्यात २५ तो ३० वगोटातील दोन महिला सापडल्या. ग्राहक मिळाले नाहीत.