सांगली : गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिक्षावर वाहतूक पोलीसांच्या ई-चलन कॅमेऱ्याने लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे व्यवसाय करणे मुश्किल झाले असून इ-चलन कारवाईतून वगळण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे.यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यात म्हंटले आहे की, रिक्षा चालकाला प्रवाशांच्या मर्जीप्रमाणे व्यवसाय करावा लागतो. प्रवासी हात दाखवेल, तेथे थांबावे लागते. सांगेल तेथे उतरवावे लागते. प्रवाशांमध्ये वयोवृद्ध, महिला व लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना चढ-उतार करण्यास अधिक वेळ लागतो. सामानासह लवकर उतरता येत नाही. नेमक्या याचवेळी वाहतूक पोलीस कॅमेरा घेऊन सरसावतात. छायाचित्र टिपून ई-चलन तयार करतात. रिक्षाचालक रात्री घरी जाण्यापूर्वीच मोबाईलवर कारवाईचा मेसेज आलेला असतो. निवेदनात म्हंटले आहे की, मागेल त्याला रिक्षा परवाना धोरणामुळे रिक्षांची संख्या अतोनात वाढली आहे. रस्त्यावर प्रवासी कमी आणि रिक्षा जास्त अशी स्थिती आहे. व्यवसायाच्या अपेक्षेने आपसात अनेकदा हाणामाऱ्याही होतात. अशावेळीही वाहतूक पोलीसांच्या कारवाईचा सामना करावा लागतो. मिरजेत तर खड्ड्यांमुळे रिक्षा कोठे थांबवावी असा प्रश्न पडतो. चांगल्या ठिकाणी थांबवावी, तर वाहतूक पोलीसाची भिती असते. दिवसाला ३०० ते ४०० रुपयांची जेमतेम कमाई आणि दंडापोटी ५०० ते १००० रुपयांचा भुर्दंड अशी स्थिती आहे. त्यामुळे ई-चलनाच्या कारवाईतून रिक्षाचालकांना वगळावे.निवेदन देण्यासाठी ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे राज्य अध्यक्ष महेश चौगुले, राजू रसाळ, तुषार मोहिते, प्रकाश चव्हाण, संतोष ठोंबरे, सुखदेव कोळी, रफिक खतीब, बाबासाहेब चव्हाण, अमीन मुल्ला, रफिक जमादार, महेश सातवेकर, मारुती सरगर, जावेद पटवेगार, सलीम मलिदवाले, भिमाण्णा यादवाडे आदी उपस्थित होते.सर्वाधिक फोटो रिक्षाचेमहापालिका क्षेत्रात ई-चलनासाठी सर्वाधिक छायाचित्रे रिक्षांचीच काढल्याचा दावा रिक्षा संघटनांनी पोलीस अधीक्षक व वाहतूक शाखेच्या बैठकीत केला. यासंदर्भात अधीक्षकांनी जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत संघटनेच्या उपस्थितीतच चर्चा केली.
सांगली वाहतूक पोलिसांच्या कॅमेऱ्याचा डोळा रिक्षा वाहतुकीवर
By संतोष भिसे | Published: October 29, 2022 6:15 PM