संख : व्हसपेठ (ता. जत) येथील बिराप्पा पांडुरंग तांबे यांच्या वस्तीवरील कोंडवाड्यावर बुधवारी रात्री अकरा वाजता लांडग्यांच्या कळपाने हल्ला केल्याने बारा मेंढ्या ठार झाल्या, तर दहा मेंढ्या फस्त केल्या आहेत. यात एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे तांबे वस्तीवर घबराटीचे वातावरण आहे.
तांबे वस्तीवरील बिराप्पा पांडुरंग तांबे यांचे घर गावालगतच्या आसंगी (ता. जत) रस्त्यालगत कमानीजवळ आहे. शेतीबरोबरच त्यांचा मेंढीपालन व्यवसाय आहे. दिवसभर मेंढ्या रानात चारुन रात्री सात वाजता जाळीच्या कुंपणात त्यांना ठेवले होते. बुधवारी रात्री ११ वाजता चार ते पाच लांडग्यांच्या कळपाने मेंढ्यांवर अचानक हल्ला केला. रात्री पाऊस असल्याने कुटुंबातील सर्व लोक घरात झोपले होते. त्यामुळे या लांडग्यांच्या कळपाची चाहूल त्यांना लागली नाही. मेंढ्यांच्या ओरडण्याने घरातील सर्व लोक जागे झाले. सर्वजण बाहेर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यानंतर आरडाओरड केल्यानंतर लांडग्यांनी पळ काढला.
या हल्ल्यात लांडग्यांनी बारा मेंढ्या फस्त केल्या. गावकामगार तलाठी शंकर बागेळी, सहायक वनसंरक्षक पाटील, पशुधन विकास अधिकारी ए. एस. राठोड, वनपाल शकील मुजावर, वनरक्षक धोंडाप्पा हुग्गे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यामध्ये एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
लांडग्यांनी हल्ला केलेल्या शेळ्या, मेंढ्या या पाळीव प्राण्यांच्या नुकसानीस वनसंरक्षक वन्यजीव कायद्याने वन विभागाकडून मदत दिली जाते. २०१७-१८ या वर्षात शेतकºयांना अडीच लाखापर्यंत मदत मिळाली आहे. या मेंढपाळांनाही मदत मिळावी, अशी मागणी मेंढपाळांनी केली आहे.