तासगाव : द्राक्ष वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून कामगारांना घेऊन जात असताना मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास येळावी (ता. तासगाव) हद्दीतून टेम्पो अडवून दोन लाखांच्या रोख रकमेसह टेम्पो पळवून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी दोन दिवसांत छडा लावला. सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून वाळवा येथील आठ आरोपींना अटक करण्यात आली.राकेश शिवाजी पाटील (वय ३०), संग्राम रावसाहेब पाटील (२६), निहाल इसाक लांडगे (२५), रवींद्र राजाराम तुपे (३१), शरद ऊर्फ गोट्या बबन लोहार (२७), संतोष ऊर्फ महेश बाबू बनसोडे (२९), योगेश चंद्रकांत चव्हाण (२४), अमोल गणपती सावंत (२४) यांना अटक करण्यात आली.याबाबतची अधिक माहिती अशी, कर्नाटकमधील कुडची येथील द्राक्ष व्यापारी इस्माईल मोहब्बत हबीब शेख हे दहा वर्षांपासून सांगली जिल्ह्यात द्राक्ष खरेदीचा व्यवसाय करतात. मंगळवारी त्यांचा टेम्पो (केए २२ सी २९८६) कुडची येथून कामगारांना घेऊन द्राक्ष नेण्यासाठी आला होता. येळावी येथे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सात ते आठजणांनी टेम्पो अडविला व कामगारांना काठ्यांनी मारहाण करून दहशत माजविली.
टेम्पोतील दिवाणजी ईस्माईल हुसेनबा मोमीन (३८) यांच्या खिशातील एक लाख ६० हजार रुपये, तसेच टेम्पोच्या ड्रॉवरमधील ४० हजार रुपयांसह टेम्पो घऊन आरोपी पसार झाले. याबाबत दिवाणजी मोमीन यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली होती.या फिर्यादीनंतर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, सहायक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र थोरावडे, पोलीस हवालदार संजय माने, पोलीस नाईक हेमंतकुमार ओमासे, विलास मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल दरिबा बंडगर यांनी या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास करून वाळवा येथील आठ आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचा टेम्पो, दोन लाख रुपयांची रोकड, यासह गुन्ह्यात वापरलेल्या चार दुचाकी आणि मोबाईल असा सात लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.गुरुवारी आठही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सहायक पोलीस निरीक्षक दंडिले यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.आरोपीकडून सुडापोटी कृत्य दरोडाप्रकरणातील मुख्य आरोपी राकेश पाटील हा संबंधित द्राक्ष व्यापाऱ्यांकडे एजंट म्हणून काम करीत होता. वाळवा परिसरातील द्राक्ष बागा विकण्यासाठी तो मध्यस्थी करीत होता.वाळव्यातील एका शेतकऱ्यांची ठरविलेली बाग व्यापारी शेख यांनी खरेदी केली. मात्र, निम्म्याबागेतील द्राक्ष नेल्यानंतर उर्वरित द्राक्षे काढली नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांने राकेशवर रोष व्यक्त केला होता. व्यापाऱ्यांमुळे नुकसान झाल्याचा राग मनात धरून संबंधित व्यापाऱ्याला धडा शिकविण्यासाठीच चोरी केली.