सांगली : सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन बंद घरे फोडली. दोन्ही घरातील सोन्याचे दागिने, कॅमेरा व रोकड असा दोन लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला.खणभागातील आझाद व्यायाम मंडळाजवळ ओंकार अपार्टमेंटमध्ये संतोष नामदेव गरड राहतात. गुरुवारी सकाळी ते कुटुंबासह परगावी गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटून प्रवेश केला. बेडरुममधील कपाट उघडून त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमध्ये डबा होता. या डब्यातील सोन्याचे दोन ग्रॅमचे गंठण, दीड ग्रॅमची कर्णफुले, दोन ग्रॅमची चेन व चांदीचे ब्रेसलेट असा एक लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी सहा वाजता गरड कुटुंबासह घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.विश्रामबाग हद्दीत पार्श्वनाथ कॉलनीत पौर्णिमा श्रीपाद खिरे यांचा कौमुदी बंगला आहे. त्याचे पती श्रीपाद खरे सांगली अर्बन बँकेत संचालक आहेत. ते गुरुवारी बँकेच्या कामासाठी मुंबईला गेले होती. घरी पौर्णिमा खिरे एकट्याच होत्या. त्याही रात्री बंगल्याला कुलूप लाऊन मालू हायस्कूलजवळील नातेवाईक प्रसन्न करंदीकर यांच्या घरी मुक्कामास गेल्या होत्या. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाटातील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ३० हजारांचा कॅमेरा, ४० हजारांची रोकड असा ९५ हजारांचा माल लंपास केला. शुक्रवारी सकाळी पौर्णिमा खिरे घरी गेल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुपारपर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरु होते.तिसरी घरफोडीगेल्या चार दिवसातचोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसापूर्वी संजयनगरमधील रजपूत मळ्यातील लिलावती अर्पामेंटमध्ये राहणारे राहूल नागराळे यांचा फ्लॅट फोडून ६८ हजाराचा ऐवज लंपास केला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी चोरट्यांनी पुन्हा एक फ्लॅट व बंगला फोडून सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास केला. चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांना आव्हान बनले आहे.
सांगलीत दोन बंद घरे फोडली, सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 8:18 PM