सांगली : अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी खरसोळी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील रामचंद्र संताजी कसबे (वय २०) व दादासाहेब आनंदा ओव्हाळ (२०) या दोन आरोपींना दोषी धरुन तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. व्ही. ए. दिक्षित यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
मिरजेतून ती अंकली (ता. मिरज) येथे आजोळी आली. ९ आॅक्टोंबर रोजी ती दवाखान्यात निघाली होती. त्यावेळी आरोपींनी तिला गाठले. तिला जबरदस्तीने दुचाकीवरुन पळवून नेले. तिच्याशी अश्लिल वर्तन केले. मुलीने आरोपींच्या तावडीतून सुटका घेतली.
घरी आल्यानंतर तिने हा प्रकार सांगितला. घरच्यांच्या मदतीने तिने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सरकारतर्फे या खटल्यात सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. यामध्ये पिडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी व पंच, तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.तिनही गुन्ह्यात दोषीकसबे व ओव्हाळ या दोन्ही आरोपीविरुद्ध मुलीचे अपहरण, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने या तिनही गुन्ह्यात त्यांना दोषी ठरविले. प्रत्येक गुन्ह्यात तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
कसबे हा मुख्य आरोपी आहे. त्याने मुलीशी अश्लिल वर्तन केले. पण त्याला ओव्हाळ याने मदत केली. मदत करणाराही तेवढाच दोषी असल्याचे मत न्यायालयाने हा निकाल देताना नोंदविले आहे.