सांगली - कृष्णा नदीत उडी मारणारे दोघे तरूण पाण्यात प्रवाहातून वाहत जात असल्याचा थरार अनेकांना पहायला मिळाला. यावेळी रेस्क्यू टीममधील तरूणाने धाडसाने दोघांना पाण्यात असलेल्या वीजेच्या खांबाजवळ ढकलत आणले. त्यानंतर लाईफ जॅकेटच्या मदतीने दोघांना काठावर आणले. परंतू काठावर येताच दोघांनी कारवाईच्या भीतीने धूम ठोकली.
नदीतील पाण्याची पातळी वाढत असताना काही अतिउत्साही तरूण स्टंटबाजी करत आहेत. शुक्रवारी देखील दोघा तरूणांनी बायपास पुलाजवळ पाण्यात उडी घेऊन स्टंटबाजीचा प्रयत्न केला. परंतू तो अंगलट आला. दोघेजण पाण्यातून वाहून जाऊ लागले. त्यांना पात्राबाहेर येता येईना. त्यामुळे त्यांनी आरडाओरड सुरू केला. पुलावरून काहीजण हा थरार पाहत होते. तेव्हा रेस्क्यू टीममधील तरूणाने धाडसाने पाण्यात उडी घेऊन दोघांना कसेबसे ओढत सरकारी घाटाजवळील पाण्यात बुडालेल्या वीजेच्या खांबाजवळ आणले. दोघांनी खांबाला घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर तो तरूण बाहेर आला.
दरम्यान, याचवेळी प्रांत उत्तम दिघे, अपर तहसीलदार अश्विनी वरूटे, मंडल अधिकारी विनायक यादव, तलाठी शिवाजी चव्हाण हे दुधगावला निघाले होते. आयर्विन पुलावरील गर्दी कमी करण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यांना दोन तरूण पाण्यात अडकल्याचे समजले. त्यांनी तत्काळ गाडीतील लाईफ जॅकेट पट्टीच्या पोहणाऱ्यांना दिली. ते घेऊन अनिकेत कोळी, ओंकार मेंडगुले, अमित शिंदे, अमोल पाटील यांनी पाण्यात पोहत जात दोघा तरूणांना लाईफ जॅकेट दिले. त्यानंतर त्यांना सुखरूपपणे पाण्याबाहेर काठावर आणले. काठावर येताच दोघे तरूण पोलिस कारवाई करतील या भीतीने गर्दीतून पळून गेले. परंतू हा थरार अनेकांनी पाहिला. रेस्क्यू टीमच्या जवानाचे कौतुक केले.
स्टंटबाजी करणाऱ्यावर कारवाईपुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणाऱ्या रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी चौघांवर गुन्हे दाखल केले. यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिला.