तासगाव : तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसाकडेच गांजा सापडला. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशिक्षण केंद्रातील राखीव पोलिस निरीक्षक राजाराम गणपती सातवेकर यांनी संबंधीत पोलिस प्रशिक्षणार्थी जतीन दत्ता कातकडे (वय २२) यांच्यासह गांजा पुरवणारा जीवन श्रीपती कांबळे(वय ३५, रा. सिध्दार्थनगर, पलूस) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही तासगाव पोलिसांनी अटक केली.याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात चौथ्या सत्रातील पोलिस शिपाई प्रशिक्षण सुरु आहे. ६५२ प्रशिक्षणार्थी या केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. बुधवारी प्रशिक्षणाच्या तासासाठी एक बॅच रात्री पावणेआठ वाजता निवासी वसतिगृहाबाहेर आली होती. यावेळी मुंबई पोलिस दलात भरती झालेला, प्रशिक्षणार्थी पोलिस जतीन दत्ता कातकडे याच्या खिशात गांजाची पुडी आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या खोलीतील कपाटाची तपासणी केली.या कपाटात देखील गांजा पुडी सापडली. कातकडेकडून तीन हजार रुपये किंमतीचा ४७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या घटनेनंतर प्रशिक्षण केंद्रातील राखीव पोलिस निरीक्षक सातवेकर यांनी तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कातकडे याला ताब्यात घेतले.
कातकडेकडे तपासातून गांजा पुरवणाराचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार पलूस येथील जीवन कांबळे याला ताब्यात घेण्यात आले. अटक केल्यानंतर दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची एक पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दंडिले करत आहेत.