सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे १६० बेशिस्त वाहनधारक शहरातील विविध मार्गावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ई-चलनच्या माध्यमातून घरी नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व वाहनधारकांकडून प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे ३२ हजाराचा दंड वसूल केला जाणार आहे. अन्यथा त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले पाठविले जाणार आहेत.ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, सीटबेल्ट न घालणे, नियमबाह्य नंबर प्लेट, कर्कश हॉर्न, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन लावणे, लायसन्स नसणे, हेल्मेट न घालणे यासह इतर वाहतूक नियम वाहनधारकांकडून मोडले जातात. वाहतूक पोलिसांनी अडविल्यानंतर दंड भरण्यास टाळाटाळ केली जाते. आपण नियम तोडलाच नाही, असे सांगून वाहतूक पोलिसांशी वाद घालतात.
याला आळा घालण्यासाठी गतवर्षी ई-चलन प्रणाली सुरू केली. ई चलनच्या माध्यमातून बेशिस्त वाहनधारकाचे वाहतूक पोलीस मोबाईलवर फोटो घेऊन त्याला दंडात्मक कारवाईची घरी नोटीस पाठवितात. दुपारच्यावेळी तसेच रात्री आठनंतर वाहतूक पोलीस रस्त्यावर नसतात. त्यावेळीही वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही.सांगली, मिरज व कुपवाड शहरात ७८ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांची मदत घेऊन दररोजच्या फुटेजची तपासणी करुन बेशिस्त वाहनधारकांची यादी बनविली जात आहे. फुटेजमध्ये वाहतूक पोलीस तसेच सिग्नल सुरु असतानाही अनेक वाहनधारकांनी नियम तोडल्याचे स्पष्टपणे दिसते.
ट्रिपल सीट जाणे, मोबाईल बोलणे, सिग्नल लागला असताना झेब्रा क्रॉसींग ओलांडणे, नो-पार्र्कींगमध्ये वाहन लावणे, विरुद्ध दिशेने जाणे आदी वाहतूक नियम तोडलेले १६० वाहनधारक सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम यांनी या वाहनधारकांनातुम्ही वाहतुकीचा नियम कधी व कुठे तोडला, याची नोटीस फोटोसह घरी पाठविली आहे. त्यांना दंड भरावा, अन्यथा न्यायालयात खटला पाठविला जाईल, असा इशारा दिला आहे.वाहनावरील कारवाईचा तपशील
- * ट्रिपल सिट : १६
- * मोबाईलवर बोलणे : १०
- * झेब्रा क्रॉसींग ओलांडणे : २८
- * विरुद्ध दिशेने जाणे : ४
- * फॅन्सी नंबर प्लेट : २२
- * नो-पार्र्कींग : ५६
- * सिग्नल जम्पींग : २४
एकूण कारवाई : १६० वाहने