सांगली : ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत किंवा कृष्णधवल आहेत, अशा मतदारांनी दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी त्यांचे अलिकडच्या काळातील रंगीत फोटो जमा करावेत. दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी फोटो जमा न केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील नियम 22 नुसार संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी स्पष्ट केले आहे.जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून अचूक, परिपूर्ण व 100 टक्के रंगीत छायाचित्रयुक्त मतदार याद्या तयार करण्याबाबत भारत निवडणूक आयोग व प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून निर्देश प्राप्त झाले आहेत.
दिनांक 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये फोटो नसलेले 81 हजार 10 इतके मतदार आहेत. तसेच 71 हजार 817 इतक्या मतदारांचे फोटो कृष्णधवल आहेत.ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत किंवा कृष्णधवल आहेत, अशा मतदारांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत आगाऊ नोटीस देण्यात येणार आहे.
या नोटीसीस अनुसरून संबंधित मतदारांनी त्यांचा अलिकडच्या काळातील रंगीत फोटो त्यांच्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसिल कार्यालयात जमा करावेत.
सांगली विधानसभा मतदार संघातील मतदारांनी त्यांचे रंगीत फोटो जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांच्या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे.