सांगली : महापालिका क्षेत्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात प्रशासन व सत्ताधारी भाजपकडून जाणिवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप नगरसेवक फिरोज पठाण यांनी केला. भाजप व प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी प्रभाग १५ मधील नागरिकांचा महापालिकेवर घागर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पठाण म्हणाले की, भाजपची सत्ता आल्यापासून शहरात पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडालेला आहे. प्रशासनातील अधिकारी भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहेत. काँगे्रस-राष्ट्रवादीच्या प्रभागात तर जाणीवपूर्वक ठरवून पाणीटंचाई निर्माण केली जात आाहे.
प्रभाग १५ मधील पत्रकारनगर, गणेशनगर, रमामातानगर, सीतारामनगर, काळे प्लॉट, गणेशनगर, सुर्वधर्म चौक, भगतसिंग चौकश रुईराज सोसाटी, गारपीर चौक, विद्यानगर आदी भागात पाणीपुरवठा जवळजवळ ठप्पच आहे.
पाणीपुरवठा अभियंत्यांसह अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तरी कोणी दखल घेत नाही. जे अधिकारी पाणीपुरवठ्याचे चांगले नियोजन करीत होते त्यांना जीवन प्राधिकरण विभागाच्या वादातून बदलण्यात आले. नवे अधिकारी पदभार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला कोणी वालीच नाहीत.नगरसेविका शुभांगी साळुंखे म्हणाल्या, प्रभाग ९ व ११मध्ये चारही नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. तेथेही पाणीपुरवठा सुरळीत नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना बदनाम करण्याचा डाव सुरू आहे. एकूणच या कारभाराविरोधात बुधवारी जनतेला घेऊन महापालिकेवर घागरमोर्चा काढणार आहोत. नगरसेवक मंगेश चव्हाण, पवित्रा केरिपाळे, आरती वळवडे यांच्यासह नागरिक यामध्ये सहभागी होणार आहेत.