अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन उपसा योजनांची १३० कोटी ५० लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. बिल भरले नसल्यामुळे पाटबंधारे विभागाने आवर्तन सुरू केलेले नाही.
शिवाय महावितरणची थकबाकी ६६ कोटी ४३ लाखांवर पोहोचली आहे. ती भरल्याशिवाय योजनांचा वीजपुरवठा सुरू करण्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे योजनांचे आवर्तन अडचणीत सापडले आहे.टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांमुळे खानापूर, कडेगाव, तासगाव, मिरज पूर्व, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळाले आहे. तेथील जमीन ओलिताखाली आली. बागायती क्षेत्रातही वाढ झाली आहे.
२००२ पासून योजनांना प्रत्यक्षात सुरुवात झाली. योजना सुरू झाल्या तरी, दुष्काळाची दाहकता कायम होती. दुष्काळी परिस्थिती असल्याने सिंचन योजनांची बिले टंचाईच्या निधीतून भरण्यात येत होती. त्यामुळे पाच ते सात वर्षे पाणीपट्टी अथवा वीज बिलाची समस्या निर्माण झाली नव्हती.मागील दोन वर्षापासून चांगला पाऊस होत असल्याने पाणीटंचाई दूर झाली आहे. त्यामुळे टंचाई जाहीर होण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही. गतवर्षी शासन आणि पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याची विनंती केली होती.
शेतकऱ्यांनीही पाणी वेळेत मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन ती भरण्यास सहमती दर्शविली. मात्र पाणीपट्टी आणि वीजबिल यांचा ताळमेळ घालताना पाटबंधारे विभागाच्या नाकीनऊ येत आहे.
तिन्ही योजनांची १३० कोटी ५० लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. टेंभू योजनेची ३५ कोटी ६९ लाख, ताकारीची ४६ कोटी ६३ लाख, तर म्हैसाळ योजनेची ४८ कोटी १५ लाख रुपये पाणीपट्टी थकीत आहे. मध्यंतरी शासनाकडून पाणीपट्टीची थकबाकी रद्द करण्याचा विचार सुरू होता. त्यामुळे पाणीपट्टी भरली नाही.
थकीत पाणी आणि वीज बिलामुळे तिन्ही सिंचन योजना १५ आॅक्टोबरपासून बंद आहेत. आॅक्टोबरमध्ये चांगला पाऊस झाल्याने पाण्याची गरज भासली नाही. मागील आठ दिवसांपासून थंडीच्या कडाक्याबरोबर दिवसा उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतीला पाण्याची गरज निर्माण झाली आहे.
तिन्ही सिंचन योजनांचे ६६ कोटी ४३ लाखांचे वीजबिल थकित आहे. टेंभू योजना २१ कोटी ५७ लाख, म्हैसाळ ३४ कोटी ४९ लाख, तर ताकारी योजनेचे वीजबिल १० कोटी ३७ लाख रुपये थकित आहे.
पाणी योजना दोन महिन्यांपासून बंद असून, तात्काळ आवर्तन सुरु करण्यासाठी २० कोटी रुपयांची गरज आहे. टेंभू आणि म्हैसाळसाठी प्रत्येकी ८ कोटी, तर ताकारीसाठी ४ कोटी भरावे लागणार आहेत.
थकबाकी भरल्याशिवाय वीज मिळणार नसल्याचा पवित्रा महावितरण कंपनीने घेतला आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ पाणीपट्टी भरावी, असे आवाहन ताकारीचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी केले आहे.
ताकारी आणि टेंभू योजनेच्या टंचाई काळात सोडलेल्या आवर्तनाचा टंचाई निधी शासनाकडे अडकला आहे. टेंभू आणि ताकारीचा टंचाई निधी तात्काळ निधी देण्यात यावा, याबाबतची मागणी शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी अर्थ विभागाकडे केली आहे. त्याबाबतचा निर्णयही दोन दिवसात होण्याची शक्यता असल्याचे आ. बाबर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पैसे भरल्याशिवाय पाणी मिळणार नसल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.कपातीचे पैसे : पाटबंधारेकडे कधी?सिंचन योजनांच्या कार्यक्षेत्रातील साखर कारखानदारांनी पाटबंधारेच्या पाणीपट्टीची कपात ऊस बिलातून केली आहे. काही कारखान्यांनी कपात केलेली रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरली आहे.
उर्वरित कारखान्यांनी अद्यापही पैसे भरले नसल्यामुळे थकबाकीचा डोंगर वाढला आहे. शेतकऱ्यांची कपात केलेली रक्कम साखर कारखानदार पाटबंधारे विभागाकडे कधी भरणार आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.सिंचन योजनांची थकबाकी (कोटीत)योजना पाणीपट्टी वीजबिलटेंभू ३५.६९ २१.५७ताकारी ४६.६३ १०.३७म्हैसाळ ४८.१५ ३४.४९एकूण १३०.६६ ६६.४३