- शरद जाधव सांगली -शहरातील वानलेसवाडी परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेदम मारहाण करत चाकूने निर्घृण खून केल्याची शिल्पा सदाप्पा कटीमणी (वय २५ रा. कक्केरी जि. यातगिरी, कर्नाटक) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत शिल्पा यांच्या आई मंजुळा उर्फ लक्ष्मीबाई शिवरुद्र दोड्डमणी (रा. मूळ तळवारगीर कर्नाटक, सध्या वानलेसवाडी, सांगली) संशयित सिदाप्पा नागाप्पा कटीमणी (वय ३० रा. कक्केरी जि. यातगिरी कर्नाटक) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. खूनानंतर संशयित सिदाप्पा हा पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत शिल्पा कटीमणी यांचा विवाह कक्केरीमध्ये राहणाऱ्या संशयित सिदाप्पा कटीमणी याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर संशयित सिदाप्पा हा वारंवार शिल्पावर संशय घेत होता. दारूच्या नशेत तो वारंवार मारहाण करत असे. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिल्पा सांगलीतील वानलेसवाडी येथे बांधकामावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या आईकडे आल्या होत्या.
गुरूवारी संशयित सिदाप्पा हा पत्नी शिल्पाला घेऊन जाण्यासाठी वानलेसवाडीत घरी आला. यावेळी शिल्पा यांनी त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. या रागातून त्याने शिल्पाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी संशयिताने शिल्पावर चाकूने चार वार केले. पोटात चाकूचा वर्मी घाव बसल्याने त्या कोसळल्या शिल्पा यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्याने तेथून पळ काढला. चाकूचा वर्मी घाव बसल्याने शिल्पा यांचा जागीच मृत्यू झाला.
विश्रामबाग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शिल्पा यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मिरजचे पोलीस उपअधीक्षक प्राणिल गिल्डा यांनी घटनास्थळाची भेट देत पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. घटनेनंतर संशयित सिदाप्पा हा पसार झाला असून, विश्रामबाग पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी कर्नाटकात रवाना झाली आहेत.