सांगली : अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्याचा सांगली जिल्ह्यालाही फटका बसणार आहे. यामुळे महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘तौक्ते’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. वेगवान वादळासह मुसळधार पावसाचा सांगली जिल्ह्याला तडाखा बसण्याची शक्यता आहे. वीजयंत्रणेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे महावितरणची यंत्रणा सुरळीत वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहे. आता चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरणने कर्मचाऱ्यांसाठी ‘हाय अलर्ट’ जाहीर केला असून सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे उपकेंद्र आणि भांडार केंद्रांमध्ये आवश्यक यंत्रसामग्रीचा साठा करून ठेवण्यात येत आहे. यामध्ये विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईल व इतर तांत्रिक साहित्याचा समावेश आहे. यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व एजन्सीजना आवश्यक मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह तयार राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.