सांगली : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी सांगली बंद व मोर्चाचे आयोजन केले आहे. सर्व शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, शेकाप यामध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या निमित्ताने आता आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी सर्वपक्षीय ताकद एकवटण्यात येत आहे. भाजप वगळता सर्व पक्ष, संघटनांनी एकत्रितपणे आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी घेतला. ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा देण्यासाठी आज सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी यासंदर्भात चर्चा केली आणि सर्व पक्ष, संघटनांना एकत्रित केले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सांगलीच्या स्टेशन चौकात शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येणार आहेत. स्टेशन चौकातून सुरू झालेला मोर्चा राजवाडा, मेन रोड, मारुती रोड, शास्त्री चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी मंडई, छत्रपती शिवाजी पुतळा, तरुण भारत क्रीडांगण, महापालिका, राजवाडा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहे. याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सभाही घेतली जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी सांगितले की, शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, कमी व्याजदराने कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सर्वच घटकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. किसान सभेचे उमेश देशमुख म्हणाले की, संप मिटल्याची चर्चा पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यास सडेतोड उत्तर देण्यासाठी व आम्ही सर्व एकसंध आहोत, हे सांगण्यासाठी आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवित आहोत. यांचा आंदोलनास पाठिंबा...काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, अजिंक्य पाटील, बजरंग पाटील, अनिल शेटे, जनता दलाचे अॅड. के. डी. शिंदे, जनार्दन गोंधळी, मनसेचे माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती शिंदे, अमर पडळकर, शहर सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे, हमाल पंचायतीचे विकास मगदूम, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, शेतकरी संघटनेचे सुनील फराटे, अशोक माने, आदी नेत्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला असून, ते मोर्चात सहभागी होणार आहेत.
सांगलीत बंद कडकडीत पाळणार
By admin | Published: June 05, 2017 12:10 AM