सांगली : सांगलीच्या हळदीचे देश आणि राज्यस्तरावर ब्रॅण्डिंग व्हावे, यासाठी शहराला ‘यलो सिटी’ बनविण्याचा निर्धार महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. इंजिनिअर अँड आर्किटेक्ट सभागृहात यलो सिटीबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यलो सिटीच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.या चर्चासत्राला उपमहापौर उमेश पाटील, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, आभाळमाया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद चौगुले, आर्किटेक्ट प्रमोद परिख, क्रेडाईचे अध्यक्ष रवींद्र खिलारे, राज्य उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. प्रमोद चौगुले यांनी देश, विदेशातील यलो सिटीची माहिती देत सादरीकरण केले.आयुक्त कापडणीस यांनी सांगली यलो सिटीमागील उद्देश सांगितला. सांगलीची हळद देशासह परदेशातही जाते. त्यामुळे शहरातील शासकीय इमारतींना हळदीचा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे. हळदीच्या ब्रँडिंगसाठी आणि हळदीला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करीत आहोत. पहिल्या टप्प्यात महापालिकेची सर्व कार्यालये दर्शनी बाजूंनी पिवळ्या रंगात रंगविली जाईल. त्यानंतर महापालिकेच्या शाळा, चौक, शहरात येणारे मार्ग, सार्वजनिक भिंती, जुन्या इमारतींनाही पिवळा रंग दिला जाईल. सांगलीकर जनतेनेही प्रत्येक घराची दर्शनी बाजू पिवळ्या रंगाने रंगवावी. सांगली हे देशातील आठवे यलो शहर म्हणून अस्तित्वात येणार आहे. त्यातून शहराची जागतिक ओळखही निर्माण होणार असल्याचे सांगितले.यावेळी नगरसेवक विष्णू माने, अभिजित भोसले, नगरसेवक योगेंद्र थोरात, गोपाळ मर्दा, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा यांनी मते मांडली.चर्चासत्रास नगरसेवक शेखर इनामदार, संजय कुलकर्णी, हरिदास पाटील, अतिरिक्त आयुक्त संजीव ओव्होळ, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, अग्निशमन अधिकारी विजय पवार, शहर अभियंता परमेश्वर हलकुडे, डॉ. दिलीप पटवर्धन उपस्थित होते.
सांगलीला ‘यलो सिटी’ बनविणार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 5:48 PM