सांगली : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये केसपेपर पासून सर्वप्रकारचे उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, त्यामध्ये सांगली आणि मिरज येथील शासकीय रुग्णालय (सिव्हिल) येथील उपचारांचा समावेश नाही. कारण ही दोन्ही रुग्णालये ही वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्न असल्यामुळे त्यांनी या रुग्णालयांना मोफत योजनेपासून वंचित ठेवले आहे. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही ठिकाणी मोफत उपचार देण्यास भाग पाडू, अशी माहिती माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिली.प्रा. शरद पाटील म्हणाले, सांगली, मिरज सिव्हिलमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. सीमावर्ती जनतेचे आधारवड असणाऱ्या आणि आरोग्य वरदायी ठरणाऱ्या या रुग्ण्यालयांमध्ये आजही केसपेपर पासून सर्व उपचार सशुल्क घ्यावे लागतात.शासनाने नुकतीच राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची घोषणा केली आहे. त्यामध्ये सांगली आणि मिरज येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयांचा समावेश नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. दोन्ही सर्वोपचार रुग्णालयांचा समावेश मोफत उपचार सवलत योजनेमध्ये करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शासनास भाग पाडणार आहे.
शासनाने निधी द्यावासांगली, मिरज शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. या ठिकाणी औषधे आणि मूलभूत सुविधांसाठी शासनाने अनुदानाच्या माध्यमातून निधी देण्याची गरज आहे. निधी देण्याबाबतचीही शासनाकडे मागणी करणार आहे, असेही प्रा. शरद पाटील म्हणाले.