सांगली, दि. २७ : खिद्रापूर (जि. कोल्हापूर) येथील मालती नागेशराव कदम (वय ७४) या महिलेचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व साडेसात हजाराची रोकड असा दीड लाखाचा ऐवज, त्या सांगली-कुरुंदवाड एसटी प्रवासात असताना चोरट्यांनी लंपास केला.बुधवारी दुपारी ही घटना घडली. एसटी प्रवासात महिलांचे दागिने लंपास होण्याची चार दिवसातील ही तिसरी घटना आहे. तीनही घटनांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांचे दागिने लंपास झाले आहेत.
मालती कदम यांची मुलगी भिलवडी (ता. पलूस) येथे राहण्यास आहे. दिवाळीनिमित्त मुलीला फराळ देण्यासाठी त्या बुधवारी भिलवडीला गेल्या होत्या. तेथून त्या खिद्रापूरला जाण्यासाठी सांगली मुख्य बस स्थानकावर चार वाजता आल्या. सव्वाचार वाजता सांगली-कुरुंदवाड एसटी बस लागली होती. त्यांनी दागिने पर्समध्ये ठेवले व त्या बसमध्ये बसल्या.
बस आकाशवाणी केंद्राजवळ गेल्यानंतर तिकीट काढण्यासाठी त्यांनी पैसे असलेली पर्स उघडली. त्यावेळी पर्समध्ये दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हा प्रकार वाहकाला सांगितला. वाहकाने शहर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी बसमधील प्रवाशांकडे चौकशी केली. पण काहीच धागेदोरे मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.सांगलीच्या बस स्थानकावरील पोलिस गायबसांगलीच्या बस स्थानकावर चोरट्याने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. स्थानकावरील पोलिस चौकी केवळ नावापुरतीच राहिली असल्याचे दिसून येत आहे.