सांगली : सांगलीतील फळ मार्केट- धामणी रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी सुशांत कृष्णा जाधव, रोहन माने या दोघांविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिलेच्या पतीचे हॉटेल आहे. यातील संशयित माने यास पीडितेच्या पतीने हॉटेलमध्ये येऊ नको, असे म्हटल्याने रागातून दोघे हॉटेलमध्ये आले व त्यांनी महिलेच्या पतीला जाब विचारत पीडितेला शिवीगाळ केली. तसेच पतीला खुर्च्यांनी मारहाण करून महिलेच्या पतीला जिवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद आहे.