पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार दि. १५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गरीब नवाज मस्जिदसमोर दोघांत वाद सुरू होता. यावेळी पोलीस कर्मचारी धोतरे यांनी तिथे जात ती सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयित असिफ बावा याने ४० ते ५० लोकांचा बेकायदेशीर जमाव जमवला व कोणाचे काही नाव सांगायचे नाही, त्यांचे त्यांना शोधू दे, शंभरवेळा कॉल केला तरी येत नाहीत, आता कसे काय आले आहेत, असे म्हणत फिर्यादी धोतरे यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी जमावातील इतरांनीही त्यांच्याशी हुज्जत घालत दोघांनी त्यांना धक्काबुक्की केली. धोतरे यांच्या इतर सहकाऱ्यांच्याही अंगावर जमावातील काहीजण धावून गेले. त्यामुळे अखेर धोतरे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या आदेशाचा भंग केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाच्या पुढील सूचना दिल्या. दरम्यान, संशयित बावा याची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
सांगलीत महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:25 AM