सांगलीत सहकारी संघात मजूर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. यावेळी डॉ. प्रताप पाटील, संगीता खोत, एन. एम. हुल्याळकर आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मजूर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची तीनदिवसीय कार्यशाळा झाली. राष्ट्रीय सहकार शिक्षा केंद्र व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने आयोजन केले होते. बाजार समिती आवारातील गुलाबराव पाटील सहकार प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील मजूर संस्थांचे पदाधिकारी कार्यशाळेसाठी उपस्थित होते.
सहकारी संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक डॉ. प्रताप पाटील यांच्या उपस्थितीत समारोप झाला. ते म्हणाले, प्रशिक्षणासाठी वयाची अट नसते, त्यामुळे नवनवीन माहिती घेऊन ज्ञानाच्या कक्षा विस्तारित करायला हव्यात. त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सहकारी संघ व जिल्हा सहकारी बोर्डाच्या माध्यमातून अशा कार्यशाळा नियमितपणे होत असतात, याचा लाभ घेतला पाहिजे.
यावेळी बाजार समितीचे सचिव व संघाचे संचालक एन. एम. हुल्याळकर, सुभाष खोत आदी उपस्थित होते. माजी महापौर व प्रशिक्षणार्थी संगीता खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.