सांगली : येथील गुलमोहर कॉलनीतील समर्थ मारुती मंदिराजवळील सतीश प्रभुदास सामाणी यांचा ‘पृथा’ हा बंगला फोडून चोरट्यांनी ४५ हजारांची रोकड, सोनसाखळी, सोन्याची दोन घड्याळे, चांदीची भांडी असा एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास केला. आज, मंगळवारी सायंकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सतीश सामाणी चार दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह गुजरातला गेले होते. गुलमोहर कॉलनीत राहणार्या आपल्या मावशीला त्यांनी दररोज सायंकाळी बंगल्याच्या पोर्चमधील दिवे लावण्यास सांगितले होते. रविवारी सायंकाळी मावशी दिवे लावून गेल्या होत्या. सोमवारी सकाळी त्या दिवे मालविण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना बंगल्याच्या पाठीमागील खिडकी उघडी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता, शटरचा दरवाजाही उचकटल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी सामाणी यांच्याशी संपर्क साधून बंगल्यात चोरी झाली असावी, असे सांगितले. त्यामुळे सामाणी कुटुंबीय सांगलीला येण्यासाठी निघाले होते. आज सकाळी ते आल्यानंतर चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील शटरचा दरवाजा उचकटला होता. शटरला लागून आणखी एक लाकडी दरवाजा होता. त्याचा कडी व कोयंडा उचकटून चोरटे बंगल्यात गेले. बेडरूममधील कपाटातील साहित्य विस्कटून टाकून त्यातील ४५ हजारांची रोकड, दोन सोन्याची घड्याळे, एक सोनसाखळी, चांदीची परात, तीन ताटे असा एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरा सामाणी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
सांगलीत पाच लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: May 21, 2014 1:07 AM