सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या कुंपणाच्या भिंतीवर बुधवारी टीका करणारा मजकूर लिहिण्यात आला. ‘देश का चौकीदार चोर है’, असे आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात आल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. सांगली विधानसभा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.
सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या भिंती रंगविण्याचे काम सध्या सुरू आहे. बुधवारी दुपारी युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्रिकोणी बागेपासून मुख्य बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर रूग्णालयाच्या उत्तरेकडील भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण केले. ‘देशका चौकीदार चोर है’ असे वाक्य लिहून त्याखाली सांगली विधानसभा क्षेत्र युवक कॉंग्रेस असा उल्लेख केला होता. याची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी यांच्याबद्दलच ही टीप्पणी असल्याच्या भावनेतून भाजपच्या कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. अतुल माने, अमोल कणसे, नाना शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते तिथे जमा झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथकही शासकीय रूग्णालयाकडे आले. तोपर्यंत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भिंतीवरील मजकूर लिहून निघून गेले होते. घटनास्थळी भाजपचे कार्यकर्ते जमू लागल्याचे दिसताच पोलिसांनीच पुढाकार घेऊन या मजकुरावर रंग लावून तो पुसून टाकला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच ही टिप्पणी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे, असा आरोप करीत भाजप कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. देशाच्या ज्येष्ठ नेत्याबद्दल आक्षेपार्ह टीप्पणीबाबत भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप युवा मोर्चाच्यावतीने सरचिटणीस परशराम कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, वसंतदादा शासकीय रूग्णालयाच्या कुंपणाच्या भिंतीवर युवक काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्रातील युवकांनी देशाच्या पंतप्रधानांचा चोर असा उल्लेख करून अपमान केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.रात्री उशिरापर्यंत तक्रार नाहीसांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयाच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याबद्दल रात्री उशिरापर्यंत कोणतीच तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही, असे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले. तक्रार प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.