सांगली : शहरातील कर्नाळ रस्त्यावरील अजित बाबूराव अंगडगिरी (वय १९) या तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. सुफियान फिरोज बागवान (वय १९, रा. शंभरफुटी रोड, सांगली), सुजित राजाराम शिंदे (१९, रा. दुर्वांकुर कॉलनी, श्यामरावनगर, सांगली) व सौरभ सदाशिव वाघमारे (२०, रा. एमएसईबी पाठीमागे, शंभरफुटी रोड, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून त्यांनी हा खून केल्याची कबुली दिली.
कर्नाळ रस्त्यावरील ऐश्वर्या गार्डनशेजारी राहण्यास असलेल्या अजित अंगडगिरी याचा बुधवारी सायंकाळी पद्माळे फाटा म्हसोबा मंदिर ते माधवनगर रस्त्यावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. खुनाच्या घटनेनंतर सांगली शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक संशयितांचा शोध घेत होते. यावेळी संशयित बागवान, शिंदे व वाघमारे यांचा यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुढील कारवाई केली. संशयित सुफियान बागवान याचा अजित अंगडगिरी याच्यासोबत काही दिवसांपूर्वी कॉलेज कॉर्नर येथे वाद झाला होता. हाच राग मनात धरून त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे सांगितले. बुधवारी तिघे माधवनगर रस्त्यावरील शेतात काम करीत असलेल्या अजितजवळ गेले व त्यांनी त्यास रस्त्यावर बोलावून घेत त्याच्या छातीवर, हातावर, पाठीवर वार करून त्याचा खून केल्याची कबुली दिली.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विजय सुतार, गुंडोपंत दाेरकर, दिलीप जाधव, विक्रम खोत, संदीप पाटील, आर्यन देशिंगकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.पोलिसांकडून तिघांचा शोध सुरू असतानाच तानंग फाटा येथून शिंदे व वाघमारे यांना तर बागवानला मिरज रेल्वे स्थानकाजवळून पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. तिघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र, त्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.