सांगली : येथील संजयनगरमधील गुंड सनी कांबळे याच्या खून प्रकरणातील संशयित व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी पदाधिकारी जमीर मुनवरअली रंगरेज (वय ३९, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, साखर कारखान्यासमोर, माधवनगर रस्ता, सांगली) यास अटक करण्यात शहर पोलिसांना मंगळवारी रात्री यश आले. गेली तीन महिने गुंगारा देत तो फरारी होता. बेळगावला नातेवाईकांकडे जाण्याच्या तयारी असताना पेठनाका (ता. वाळवा) येथे त्याला पकडले.कॉलेज कॉर्नरवरील हॉटेल अक्षरम ते दुर्गामाता मंदिराच्या पिछाडीस असलेल्या रस्त्यावर गुंड सनी कांबळे याचा कुकरीने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला होता. ३ आॅक्टोबर २०१८ रोजी भरदिवसा ही घटना घडली होती.
याप्रकरणी इम्रान ऊर्फ चिच्या शेख, संदीप भोसले, रफिक शेख, अक्षय मोहिते, धनाजी बुवनूर व एक अल्पवयीन संशयित अशा पाच संशयितांना अटक केली होती. अल्पवयीन संशयित १७ वर्षाचा होता. तो एका महाविद्यालयात बारावीत शिकत होता. त्यानेच प्रथम सनीवर हल्ला केला होता.
माधवनगर रस्त्यावरील कलानगर येथे अडीच वर्षापूर्वी गुंड रवी माने याचा खून झाला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठीच सनीचा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. अटकेतील संशयितांच्या चौकशीत जमीर रंगरेज याचे नाव निष्पन्न झाले होते. त्याच्याविरुद्ध सनीच्या खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सनीचा खून झाल्यापासून रंगरेज भोवऱ्यात सापडला होता. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच तो मोबाईल बंद करून पसार झाला. ज्यादिवशी तो पसार झाला, त्याचदिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यास चौकशीसाठी बोलाविले होते.
गेली तीन महिने पोलीस त्याच्या मागावर होते. पण तो सापडत नव्हता. बेळगाव येथे त्याच्या नातेवाईकांचे निधन झाले आहे. त्यांचे सांत्वन करण्यासाठी तो मंगळवारी रात्री पेठनाकामार्गे जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर शहर पोलिसांनी त्याला पकडले.जमीरने रचला खुनाचा कटसनीच्या खुनाचा कट रचण्यासाठी रंगरेजने अहिल्यानगरच्या मुख्य चौकात बैठक बोलावली होती. या बैठकीतच सनीच्या खुनाचा कट शिजला. त्यानुसार रंगरेजच्या साथीदारांनी पाळत ठेवून सनीचा खून केला होता. मृत गुंड रवी माने हा जमीरचा विश्वासू साथीदार होता. त्याच्या खुनात सनीला अटक केली होती. तेव्हापासून रंगरेज टोळी सनीवर चिडून होती.