सांगली : महाविकास आघाडीने घेतलेला जिल्हा परिषद गट रचनेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केला आहे. नव्या निर्णयानुसार जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ असेल. सांगली जिल्हा परिषदेची गटसंख्या ६० ते ६१, तर पंचायत समिती गणसंख्या १२० ते १२२ होणार असून, नव्याने रचना होणार आहे. आटपाडीचा गट व गण रद्द होऊन करंजे (ता. खानापूर) गट व गण वाढणार आहे.महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५५, जास्तीत जास्त ८५ केली होती. त्या निर्णयानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६८ गटांची, तर पंचायत समितीच्या १३६ गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आरक्षणाची सोडतही झाली होती. त्यामुळे इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला होता. मात्र, आता शासनाच्या निर्णयाने इच्छेवर पाणी फिरले आहे.नव्या निर्णयानुसार गटसंख्या कमीत-कमी ५० आणि जास्तीत-जास्त ७५ झाली आहे. पूर्वीची सर्व गट आणि गणांची रचना रद्द होऊन ती नव्याने लोकसंख्येनुसार करण्यात येणार आहे. आटपाडी शहर नगरपंचायत झाली आहे. आटपाडी तालुक्याची एक लाख ३८ हजार ४५५ लोकसंख्या असून, २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत चार गट आणि आठ गण होते. आता आटपाडी शहरासाठी नगरपंचायत झाल्यामुळे ती लोकसंख्या कमी होणार आहे. परिणामी जिल्हा परिषदेचा एक गट आणि दोन गण कमी होणार आहेत. यातूनही फेररचनेत लोकसंख्येचा विचार करून चार गट आणि आठ गण जैसे थे राहू शकतील. पण, नवीन गट आणि गणांच्या पुनर्रचनेत नाव बदलले जाणार आहे.
खानापूर नगरपंचायत झाल्यामुळे खानापूर तालुक्यात एक गट आणि दोन गण कमी झाले होते. आधी तेथे तीन गट आणि सहा गण होते. नव्या रचनेत करंजे जिल्हा परिषद गट आणि दोन गणही वाढणार आहेत. उर्वरित आठ तालुक्यांत मात्र पूर्वीप्रमाणेच गट आणि गणांची संख्या असणार आहे.
गटाची रचना ८५ ते ५५ ऐवजी ७५ ते ५० प्रमाणेराज्य सरकारने राज्यातील जिल्हा परिषद सदस्यसंख्या कमीत-कमी ५० आणि सर्वाधिक मोठ्या जिल्हा परिषदेत सदस्य संख्या ७५ निश्चित केली आहे. या सूत्रानुसार सांगली जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार ६० ते ६१ जिल्हा परिषद सदस्य, तर १२० ते १२२ पंचायत समिती सदस्य असतील. लवकरच जिल्हा प्रशासनाकडून गट आणि गणांची रचना बदलली जाणार आहे.
अशी असणार गट आणि गणांची संख्यातालुका - गट - गणआटपाडी - ३ ते ४ - ६ ते ८खानापूर - ०४ - ०८पलूस - ०४ - ०८कडेगाव - ०४ - ०८वाळवा - ११ - २२मिरज - ११ - २२शिराळा - ०४ - ०८तासगाव - ०६ - १२क.महांकाळ - ०४ - ०८जत - ०९ - १८एकूण - ६१ - १२२