सांगली : महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसमधील आजी-माजी ३० हून अधिक नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. पुढील महिन्यात त्यांचा पक्षप्रवेश होईल. भाजपने नव्या प्रभाग रचनेनुसार सर्व्हे केला असून आम्ही नक्कीच सत्तेपर्यंत पोहोचू, असा विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भाजपने यंदा महापालिका निवडणुकीसाठी ‘४० प्लस’चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याचेही ते म्हणाले.आ. गाडगीळ म्हणाले की, महापालिका निवडणुकीसाठी अजून अवकाश आहे. नव्या प्रभाग रचनेनंतर भाजपने पहिला सर्व्हे केला आहे. तो सकारात्मक आहे. भाजपला महापालिकेत निश्चित सत्ता मिळेल. आम्ही ४० पेक्षा अधिक जागा जिंकू, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आजी-माजी ३० नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. २१ अथवा २२ मे दरम्यान सांगलीत भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीनंतर महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग येईल. नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाईल. यावेळी शासनाच्या माध्यमातून कोट्यवधीची विकास कामे झाल्याने या बळावर सांगली महापालिकेत भाजपला संधी आहे.शासनाच्या नगरविकास विभागाकडील ३३ कोटींच्या निधीतून रस्ते, गटारीची कामे सुरु झाली आहेत. आणखी ३० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. या निधीतून रस्ते, गटारी, सांस्कृतिक भवन,कंपाऊंड भिंतीच्या कामाचा समावेश केला आहे. त्यापैकी नऊ कोटी लवकरच वर्ग होतील, असेही आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले.शामरावनगरमधील रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. त्या कामांची अंदाजपत्रके ड्रेनेज खुदाईपूर्वी केली होती. त्यामुळे ठेकेदाराने या चरी मुजविण्याची मागणी केली. तीन महिन्यापूर्वी आयुक्तांसोबत बैठक घेऊन सव्वा कोटीचा निधी वर्ग करण्याचा निर्णय झाला. पण आता प्रस्ताव स्थायीकडे आला. त्यातही वाद निर्माण झाला आहे. महापालिकेत काय कामकाज होते? असा सवाल करीत नाराजी व्यक्त केली.युतीबाबत चर्चा नाहीमहापालिका निवडणुकीत इतर पक्षांशी युती करणार का? असे विचारले असता गाडगीळ म्हणाले, सध्या तरी कोणत्याच राजकीय पक्षाशी युतीबाबत चर्चा केलेली नाही. पण भविष्यात युतीबाबत विचार केला जाऊ शकतो. मित्रपक्ष कुणाला नको आहेत. शिवसेनेशी युती होऊ शकते, पण यासाठी वरिष्ठ पातळीवरुन निर्णय होईल. आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामुळे सध्या तरी युतीबाबत निर्णय नाही की चर्चाही नाही.विधानसभेपूर्वी स्वतंत्र सांगली तालुकास्वतंत्र सांगली तालुक्यासंदर्भात विचारले असता गाडगीळ म्हणाले, सांगली तालुक्यासाठी आपला पाठपुरावा सुरु आहे. सध्या अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे. राजवाडा येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर तहसील कार्यालय असेल. एक मे रोजी हे कार्यालय सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेटही घेतली आहे. अप्पर तहसील कार्यालयानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र सांगली तालुक्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
सांगलीत भाजपचे मिशन ‘४० प्लस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:30 AM