अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संभ्रमाचे धुके हटल्याने आता सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवाराच्या सहभागाने निर्माण झालेला हा चौरंगी सामना चुरशीचा ठरणार आहे. मतांचे विभाजन कसे होणार आणि त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, यावरून आता तर्कवितर्क रंगले आहेत.मतदारसंघाची यंदाची लढत ही वेगळ्या समीकरणांनी सजली आहे. परंपरागत भाजप-काँग्रेसऐवजी भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटना असा सामना होणार आहे. यात दोन्ही पक्षांना वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवाराचेही आव्हान असणार आहे. यंदा जागाबदलामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आता ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. वसंतदादा घराण्यातील व्यक्तीला प्रथमच दुसऱ्या पक्षाची उसनवारी करून निवडणूक लढवावी लागत आहे. वसंतदादांचे नातू व वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी विधानसभेसाठी मशागत करून थेट लोकसभेच्या शिवारात उतरण्याचे काम केल्याने, ही राजकीय खेळी आहे, की दादा गटाच्या अस्तित्वासाठीची अपरिहार्यता, असा सवाल उपस्थित होत आहे. तरीही मैदानात उतरलेल्या तगड्या खेळाडूंमुळे सांगलीचा सामना अधिक रंगतदार होणार हे निश्चित आहे.भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात उमेदवार उभे करण्यावरून सुरू असलेला गोंधळ त्यांच्या समर्थकांच्या मनात आनंदलहरी निर्माण करणारा ठरत होता. मात्र आता दिग्गज उमेदवारांमुळे याच आनंदलहरींची जागा चिंतालहरींनी घेतली आहे. भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मोदी लाटेत सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपकडे गेला असल्याचा वारंवार उल्लेख केला जात असल्याने, यंदा भाजपला खऱ्या ताकदीची परीक्षा द्यावी लागेल. सांगलीच्या मैदानात अन्य पक्ष, अपक्षांची ताकद यापूर्वी फारशी लागत नव्हती. यंदा वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार म्हणून धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरही मैदानात असल्याने त्यांचे आव्हानही दोन्ही प्रमुख पक्षांना दुर्लक्षित करता येणार नाही. अन्य दोन उमेदवारांमुळे मतांची विभागणीही मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने, यात बाजी कोण मारणार, हासुद्धा उत्सुकतेचा विषय आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बराच कालावधी शिल्लक असल्याने आणखी बºयाच घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौरंगी सामना तिरंगी सामन्यातही बदलला जाऊ शकतो.गटबाजीचे ग्रहण दोन्हीकडेकाँग्रेस, राष्टÑवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह ५६ पक्षांच्या आघाडीमार्फत सांगलीची जागा ‘स्वाभिमानी’ लढवित आहे, मात्र त्यांनी उमेदवारी काँग्रेस नेते विशाल पाटील यांना दिली आहे. काँग्रेसमधील त्यांचे अस्तित्व अबाधित ठेवून ही उमेदवारी दिली गेल्याने, काँग्रेसअंतर्गत गटबाजीचा सामना त्यांनाही करावा लागणार आहे. राष्टÑवादीच्या मदतीबद्दलही साशंकता व्यक्त होत आहे.दुसरीकडे भाजपअंतर्गत गटबाजीही अजून शांत झालेली नाही. संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीविरोधात आमदार व पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. मुंबईत वाद मिटल्याचे सांगून आता सर्व नेते एकत्र फिरत असले तरी, कार्यकर्त्यांत अजूनही गटबाजी कायम आहे. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना गटबाजीचा सामनाही करावा लागण्याची चिन्हे आहेत.नाराजी दूर करण्याची धडपडकाँग्रेस नेते विशाल पाटील आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील या दोन्ही उमेदवारांनी सुरुवातीच्या टप्प्यात पक्षांतर्गत नाराजी संपविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. नाराज नेत्यांशी संवाद साधून वातावरण सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात त्यांना कितपत यश मिळणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
तुल्यबळ उमेदवारांमुळे सांगलीत चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:33 PM