सांगली : अनिकेत कोथळे या तरुणाचा पोलिस कोठडीत पोलिसांनी खून केल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली येथे नेऊन जाळण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीने पुकारलेल्या सांगली बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरवासीयांनी कडकडीत बंद पाळला. कृती समितीने शहरातून मोटारसायकल रॅलीही काढली. यादरम्यान तीन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली, तर एका ठिकाणी टायर पेटवून रस्त्यावर टाकण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता.लुबाडणूक प्रकरणातील संशयित अनिकेत कोथळे या तरुणाचा पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर केल्याने कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळण्यात आला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच पोलिस व एका झिरो पोलिसाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी ‘सांगली बंद’चे आवाहन केले होते. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापारी, दुकानदार, फेरीवाले, रिक्षाचालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता. शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. कापड पेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ, मारुती रोड, हरभट रस्ता या मुख्य बाजारपेठेत पूर्ण शुकशुकाट होता. विश्रामबाग परिसरातील व्यवहारही बंद होते.या बंदला रिक्षा बचाव कृती समिती, स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटना, एकता व्यापारी असोसिएशन, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना, हमाल पंचायत, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, पानपट्टी असोसिएशन, कापड पेठ व्यापारी संघटना, फेरीवाले संघटना, भाजीपाला विक्रेते संघटना, सांगली जिल्हा चालक असोसिएशन, नाभिक संघटना, खाद्य-पेय विक्रेता संघटना, रेशन दुकानदार संघटना, मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशन, टिंबर मर्चंट असोसिएशन, गणेश मार्केट विक्रेते संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, मदनभाऊ युवा मंच यांच्यासह कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना, मनसे, अवामी पार्टी, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, स्वाभिमानी विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन समाजवादी पार्टी, राष्टÑविकास सेना, भाकप, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन मुक्ती पार्टी आदी पक्ष, संघटनांनीही पाठिंबा दिला होता.दरम्यान, सर्वपक्षीय कृती समितीने स्टेशन चौकातूनच मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीत एक हजारहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते.शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी), नगरसेवक गौतम पवार, शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळे, हेमंत खंडागळे, सतीश साखळकर, अॅड. अमित शिंदे, अश्रफ वांकर, आशिष कोरी, महेश खराडे, उमेश देशमुख, नितीन चव्हाण यांच्यासह अनेकांनी काळ्या फिती लावून रॅलीत भाग घेतला. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती मंदिर, टिळक चौक, हरभट रोड, मारुती रोड, स्टॅँडमार्गे, सिव्हिल हॉस्पिटलमार्गे शहराच्या प्रमुख मार्गांवरून रॅली छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ येऊन सांगता करण्यात आली. याठिकाणी अनिकेत कोथळे याला आदरांजली वाहण्यात आली. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील चौका-चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलिस ठाण्यासमोर : जमावअनिकेतचा मृत्यू झालेल्या सांगली शहर पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव थांबून होता. तसेच स्टेशन चौकातही मोठी गर्दी होती. सर्वपक्षीय रॅलीनंतरही काहीजण शहरातून बंदचे आवाहन करीत मोटारसायकल रॅली काढत होते. ‘उपनिरीक्षक युवराज कामटे याला फाशीची शिक्षा द्या’, अशा घोषणाही दिल्या जात होत्या. या घटनेच्या निषेधाचे फलक घेऊन रॅली काढण्यात येत होती.गुरुवारी कॅँडल मार्चअनिकेत कोथळे याच्या खूनप्रकरणी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने गुरुवारी कँडल मार्च काढण्यात येणार आहे. बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कँडल मार्चला सुरूवात होऊन सांगली शहर पोलिस ठाण्यावर त्याची सांगता होईल.
सांगलीत कडकडीत बंद, बसेसवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:42 AM