सांगली : राज्य शासनाने सुगंधित तंबाखूवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी पान दुकादारांचा लढा सुरु आहे. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर दिवाळीनंतर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी दिली.सांगली जिल्हा पान असोसिएशनतर्फे शनिवारी सांगलीतील आमराईत जिल्ह्यातील पान दुकानदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सूर्यवंशी बोलत होते. ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने बसस्थाकाजवळील १२ पान दुकानांवर छापे टाकून सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. अचानक केलेल्या या कारवाईचा संघटनेच्यावतीने निषेध केला आहे. विनाकारण पान दुकानदारांना त्रास दिला जात आहे. सुगंधित तंबाखू विक्रीवरील बंदी उठविण्यासाठी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा कायदेशीर मार्गाने लढा सुरु आहे. बंदीमुळे जिल्ह्यातील पाच हजार व राज्यातील ५० लाख पान दुकानदार व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बंदी उठवावी, या मागणीसाठी लढा तीव्र केला जाईल. यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर व्यापक मोर्चा काढला जाईल.जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्तविक खजिनदार राजू पागे यांनी केले. यावेळी महापालिकाक्षेत्र अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष युसूफ जमादार, महापालिका क्षेत्र कार्याध्यक्ष इम्रान मर्चंट, जिल्हा सचिव मकरंद जमदाडे, राजू खोत, विजय पाटील, प्रकाश कोकाटे, प्रकाश मोरे, विजय चव्हाण (जत), चंद्रकांत पाटील (कवलापूर), शेखर पाटील (बुधगाव), ऐनुद्दीन कागदी (कवठेमहांकाळ), भारत डोबले (ढालगाव), सुधाकर जाधव (तासगाव), प्रकाश पेठकर, जीवंधर पाटील, मयुर बांगर, रावसाहेब सरगर, इम्रान पटेल, राजू फोंडे, अफजल चाऊस उपस्थित होते. (प्रतिनिधी)दुकाने बंद
पान दुकानदारांचा दिवाळीनंतर सांगलीत मोर्चा
By admin | Published: October 09, 2016 12:33 AM