सांगली : महापालिकेच्या नालेसफाई मोहिमेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. मे महिन्याच्या सुरुवातीपासून नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते. पण यंदा प्रशासनाने अद्याप निविदा प्रक्रियाच राबविलेली नाही. त्यामुळे नालेसफाईला विलंब लागणार आहे. परिणामी वेळेत नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण होण्याबाबतही साशंकता आहे. पावसाळा महिन्यावर आला असून, ही सफाईची मोहीम सुरू नसल्याने ऐन पावसाळयाच्या तोंडावर सफाईसाठी धावाधाव होणार आहे.सांगली शहरात ड्रेनेजव्यवस्था कालबाह्य झाल्याने प्रत्येक पावसाळयात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहते. शहरातील मारुती चौक, शिवाजी पुतळा, शिवाजी मंडई, स्टेशन रोड आदी शहरांच्या मुख्य भागातील प्रमुख रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचा डोहच साचत असतो.
पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने हे पाणी पाऊस पडल्यानंतर तास दोन तास थांबून राहते. याशिवाय शहराच्या उपनगरांमध्येही गटारीची सुविधा नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. शहरातील शंभर फुटी रोडवरही मोठी गटार आहे. ही गटार सध्या दहा-बारा फूट खोल असूनही कचरा, गाळाने अर्धी भरली आहे. याचीही सफाई केली नाही.दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेकडून कसलेच नियोजन होत नाही. मग घाईगडबडीत नाल्याची सफाई होते. पावसाळ्यात नाल्यातून पाण्याचा निचरा होत नसल्याने उपनगरात पाणी शिरते. मुख्य चौक पाण्याने तुडुंब भरून जातात. ऐन पावसाळ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा सफाईच्या कामावर लावले जाते. हा दरवर्षीचा शिरस्ता बनला आहे.यंदाही नालेसफाईबाबत प्रशासकीय स्तरावर बैठकांचा फार्स सुरू आहे. पण प्रत्यक्षात कसलीच कार्यवाही झालेली नाही. त्यात लोकसभेच्या आचारसंहितेचा अडसर आहे. आचारसंहिता एप्रिल, मे महिन्यात लागणार, याची कल्पना साऱ्यांनाच होती. त्यामुळे मार्च महिन्यात नालेसफाईचे नियोजन करता आले असते. निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराकडून मे महिन्यात काम करून घेता आले असते. पण प्रशासनस्तरावर त्याबाबत कुणालाच गांभीर्य नसल्याचे दिसून आले.आता तर मे महिना उजाडत आला तरी निविदेच्या घोळातच प्रशासन अडकले आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर निविदा काढली जाणार. त्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी जाणार, मग ठेकेदाराला वर्कआॅर्डर, समन्स देऊन प्रत्यक्षात काम सुरू करण्यास मे महिन्याच्या शेवटचा आठवडा उजाडणार आहे.