सांगली : सांगलीतील प्रतिष्ठित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सध्या घडत असलेल्या घटनांच्या निषेधार्थ व महाविद्यालय वाचविण्यासाठी ‘वालचंद बचाओ’ अभियान हाती घेण्यात येणार आहे. यासाठी बुधवार, दि. १ जून रोजी सांगलीतील राजमती भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. वालचंद महाविद्यालयात काही संधिसाधू मंडळींनी गुंडगिरी व दहशत माजवित ताबा घेतला आहे. कायद्याने स्थापन झालेल्या व राज्य शासनाची अधिकृत मान्यता असलेल्या नियामक मंडळाने नियुक्त केलेले संचालक जी. व्ही. परीशवाड यांना जबरदस्तीने पदमुक्त केले आहे. त्यांच्याजागी बेकायदेशीरपणे कोणताही अधिकार नसताना नवीन संचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व घटनांचा गंभीर परिणाम महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीवर होत असून, संस्थेच्या देदीप्यमान इतिहासाला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. वास्तविक याच मंडळींनी महाराष्ट्र टेक्निकल सोसायटीचा ताबाही असाच बेकायदेशीर पद्धतीने घेतला असून, त्याविरोधात न्यायालयीन पातळीवर प्रक्रिया सुरू आहे, असे पत्रकात म्हटले आहे.या महाविद्यालयाचे कार्य व्यवस्थित व पूर्वीप्रमाणे कायद्याच्या चौकटीत राहून चालविण्यासाठी शासनाने योग्य ती दखल घेऊन तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन करून शिंदे म्हणाले की, वालचंद महाविद्यालयातील निषेधार्ह घटनांच्या विरोधात व महाविद्यालय वाचविण्यासाठी १ जून रोजी सायंकाळी पाच वाजता नेमिनाथनगरातील राजमती भवन येथे मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी, माजी विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)वाद वाढला--वालचंद महाविद्यालयाच्या वाद उफाळून आला आहे. एमटीईने महाविद्यालयाचा ताबा घेतल्याने नियामक मंडळ अस्वस्थ आहे. नियामक मंडळाकडून पोलिसांत तक्रार केली आहे. आता या वादात बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून भाजपचे आणखी एक नेते उतरले आहे. त्यामुळे हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
सांगलीत ‘वालचंद बचाओ’ अभियान
By admin | Published: May 30, 2016 11:46 PM