ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 19 - अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, ओबीसी आरक्षण, मुस्लीम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप नको, यासह ३८ मागण्यांसाठी सांगलीत विविध पक्ष, संघटनांच्या वतीने आयोजित बहुजन क्रांती मोर्चामध्ये लाखोंच्या जनसमुदायाने हजेरी लावली. आपल्या न्याय्य हक्कांबाबत सरकारला जाग आणण्यासाठी जिल्हाभरातून आंदोलक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आंदोलकांमध्ये महिला व तरुणींची उपस्थिती लक्षणीय होती.
सकाळी साडेअकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळील कामगार भवन येथून मोर्चास सुरूवात झाली. तत्पूर्वी जिल्ह्याच्या विविध भागातून आंदोलक गटा-गटाने शहरात दाखल होत होते. ‘एकच पर्व-बहुजन सर्व’, ‘ओबीसींना आरक्षण द्या’ अशी घोषणाबाजी करीत मागण्यांचे फलक हाती घेऊन आंदोलकांनी परिसर दणाणूण सोडला होता.
अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, धनगर, रामोशी, कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, मराठा, मुस्लिम समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण मिळाले पाहिजे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, महामंडळाला निधी, लिंगायत व जैन धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा, महापुरूषांच्या जयंतीला शासकीय सुटी देण्यात यावी, यासह ३८ मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात भगवे, निळे, हिरवे ध्वज हाती घेऊन सर्वच जाती-धर्माचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर घोषणाबाजी करीत मोर्चा कॉंग्रेस कमिटी, राम मंदिर चौकमार्गे पुष्पराज चौकाकडे रवाना झाला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मोर्चाच्या वतीने मांडण्यात आलेल्या ३८ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जयसिंग शेंडगे, नामदेवराव करगणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.