ठळक मुद्देसांगलीत कॉंग्रेस-भाजपच्या परस्परविरोधी यात्राप्रजासत्ताकदिनी संघर्षाचे वारेसंविधान बचाव यात्रेविरोधात तिरंगा यात्रा
सांगली : प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगलीत कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याच्या कारणास्तव संविधान मोर्चा काढला तर त्यास प्रतिउत्तर म्हणून भाजपने तिरंगा एकता यात्रा काढली. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते.सांगलीत दोन्ही पक्षांमध्ये संघर्षाचे वारे वाहू लागले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे प्रजासत्ताक दिनादिवशीही त्यांच्यातील संघर्ष समोर आला. सांगली जिल्हा व शहर कॉंग्रेसतर्फे २६ जानेवारी रोजी दुपारी अडिच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््यास अभिवादन करून हा मोर्चा स्टेशन चौकात आला. त्याठिकाणी सभेद्वारे या संविधान मोर्चाची सांगता झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, जातीयवादामुळे देशातील आणि राज्यातील वातावरण भीतीयुक्त बनले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या काही निर्णयांमुळे भारतीय राज्यघटनेला धक्का बसेल, अशी शंका सामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा विचार करून कॉंग्रेसने संपूर्ण राज्यभरात संविधान बचाव मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. संविधान बचावसाठी यापुढेही कॉंग्रेस प्रसंगी रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात पक्षाचे निरीक्षक प्रकाश सातपुते, कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, कॉंग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील, राजन पिराळे, वहिदा नायकवडी, सुवर्णा पाटील, मालन मोहिते, सचिन चव्हाण, रवी खराडे, दिनकर पाटील, प्रशांत शेजाळ, आण्णासाहेब कोरे, मंगेश चव्हाण, अजित ढोले, बिपीन कदम, सनी धोत्रे आदी सहभागी झाले होते.सकाळी भाजपने तिरंगा यात्रा काढली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयापासून यात्रेस सुरुवात झाली. यात्रेचे नेतृत्व सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी केले. यावेळी माजी आ. दिनकर पाटील, नीता केळकर, मकरंद देशपांडे, मुन्ना कुरणे, शरद नलावडे, सुब्राव मद्रासी, संजय कुुलकर्णी, धनेश कातगडे आदी सहभागी झाले होते.सामाजिक एकोपा बाळगणे, सामाजिक न्यायाप्रती वचनबद्धता आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना हाच धर्म मानून कार्यरत राहणे हा संदेश देण्यासाठी रॅलीचे आयोजन केल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. गाडगीळ यांच्या कार्यालयापासून ही यात्रा निघून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून स्टेशन चौकात आली. राज्य घटनेच्या प्रस्तावनेचे सामुहिक वाचन करून सांगता झाली.भाजपची दुचाकी रॅलीभाजपने दुचाकी रॅली काढली होती. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वत: बुलेट हातात घेऊन रॅलीचे नेतृत्व केले. मुन्ना कुरणे यांनीही दुचाकी चालविली. अन्य नेत्यांनी सारथी घेणे पसंत केले. रॅलीत भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कॉंग्रेस नगरसेवकांची गैरहजेरीकॉंग्रेसचे काही मोजकेच नगरसेवक सोडले तर बहुतांश नगरसेवकांनी मोर्चास दांडी मारली. यापूर्वीच्या आंदोलनांचाही असाच अनुभव आहे. महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता असूनही याठिकाणचे पदाधिकारी, नगरसेवक त्यांचे कार्यकर्ते सहभागी होताना दिसत नाहीत.