सांगली : तुल्यबळ उमेदवार, दिग्गज नेत्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा यामुळे संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सरासरी ६४ टक्के मतदान झाले. गतवेळच्या तुलनेत यंदा मतांचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे. मतदानयंत्रे बिघडल्याने वेळ वाढवून दिल्यानंतर मतदारसंघातील अनेक केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्याने मतांच्या आकडेवारीचे संकलनही रात्री उशिरापर्यंत चालूच होते.सांगली लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक मतदान पलूस-कडेगाव येथे नोंदले गेले. याठिकाणी सरासरी ६८ टक्के मतदान झाले, तर सर्वांत कमी म्हणजे ६0 टक्के मतदान जत तालुक्यात झाले. जिल्ह्याची एकूण मतदान सरासरी सध्या ६४ टक्के झाली असून, बुधवारी सकाळपर्यंत अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे या आकडेवारीत काहीअंशी बदल होऊ शकतो. तरीही गत लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मताचा टक्का वाढला आहे. मतदान यंत्रातील बिघाड, मतदार यादीतील घोळ याबाबतच्या अनेक तक्रारी झाल्या. त्यामुळे मतदारांमधून संताप व्यक्त होत होता.यांच्यात आहे लढत...सांगलीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील, वसंतदादांचे नातू व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तुल्यबळ उमेदवार असल्याने यंदाची निवडणूक ही सर्वांत चुरशीची ठरली आहे.
सांगलीत ईर्ष्येने ६४% मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:49 PM