सांगली : सांगलीतील कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून, रविवारी हे पाणी नागरी वस्तीत शिरले आहे. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, दत्तनगर, कर्नाळ रस्ता या परिसरातील २० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शामरावनगरला तर पावसाच्या पाण्याने वेढाच दिला आहे. सांगलीत सकाळी कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ३४ फुटांवर गेली होती. शेरीनाल्यातून नदीचे पाणी नागरी वस्तीत शिरले. जामवाडी परिसरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील पाच घरांच्या उंबऱ्यांना पाणी लागले होते. तेथील राहणाऱ्या कुटुंबांनी स्वत:हूनच स्थलांतर केले. तसेच सायंकाळी या परिसरातील दत्तनगरमध्ये पाणी आल्याने तेथील १२ कुटुंबाना महापालिकेने सुरक्षितस्थळी हलविले. शहराला पुराचा धोका वाढू लागला आहे. कर्नाळ रस्त्याला पाणी लागले असून तेथील बांबू विक्रेते, गॅरेजवाल्यांनी आपले साहित्य हलविण्यास सुरूवात केली होती. पावसाचा जोर नसला तरी, रात्रीपर्यंत कर्नाळ रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सकाळी महापालिकेत आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त सुनील पवार, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आर. पी. जाधव, अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी दुधाळ, नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. आयुक्तांच्या सूचनेनंतर महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र रिसाला रस्त्यावरील अग्निशमन केंद्रातून गवळी गल्लीतील शाळा क्रमांक पाचमध्ये हलविण्यात आले. पालिका हतबल, नागरिक सरसावले शामरावनगर, आकाशवाणी, कालिकानगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याचे तळे साचले आहे. महापालिकेचे अधिकारी या भागाला भेट देतात, पण पाण्याच्या निचऱ्यावर उपाययोजना करण्याऐवजी नागरिकांनाच दूषणे देऊन जातात. महापालिका हतबल झाल्याने अखेर नागरिकच पाण्याचा निचरा करण्यासाठी सरसावले आहेत. कालिकानगर परिसरातील दोन रस्त्यांवर नागरिकांनी लोकवर्गणी काढून पाईप टाकल्या. जेसीबीच्या साहाय्याने पाईप टाकून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न चालविला होता. आयुक्तांपासून अनेक अधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा केला, पण आश्वासनाव्यतिरिक्त काहीच पदरात पडले नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली.
सांगलीत नागरी वस्तीत पाणी शिरले
By admin | Published: August 07, 2016 11:17 PM