लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून नव्या लाटेत संपूर्ण कुटुंबच बाधित होत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय दिला जातो. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या वाढली आहे. बहुतांश सांगलीकर आता घरीच राहून बरे होऊ, असे म्हणत आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून साडेनऊ हजार रुग्णांनी घरीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. ही बाब निश्चितच दिलासादायक म्हणावी लागेल.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. गतवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत महापालिकेने कोरोनाचा शिरकाव रोखला होता; पण ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मात्र रुग्णांची संख्या वाढली. आता मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. आतापर्यंत २२ हजार १०८ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ५० टक्के म्हणजे ११ हजार १४९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते. त्यातील ९ हजार ५४६ रुग्णांनी घरीच राहून कोरोनावर मात केली. या रुग्णांना महापालिकेकडून औषधाचे कीट दिले जाते. त्यांच्यावर वाॅच ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे; पण सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता होम आयसोलेशनमधील या रुग्णांना अपेक्षित उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेले ५० टक्क्यांपेक्षा जादा रुग्णांनी योग्य औधषोपचार घेत घरीच कोरोनावर मात केल्याचे दिसून येते.
चौकट
आरोग्य यंत्रणा तोकडी
महापालिकेच्या दहा आरोग्य केंद्रांच्या साहाय्याने गृह विलगीकरणातील रुग्णांवर वाॅच ठेवला जात आहे. गतवर्षी आरोग्य केंद्रातील डाॅक्टर, परिचारिका, आशा वर्कर्सची टीम घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांपर्यंत दररोज पोहचत होती; पण आता आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण व चाचणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गृह विलगीकरणातील रुग्णांवर देखरेख करण्यासाठी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यासाठी जनरल प्रॅक्टिसिंग डाॅक्टरांची मदत घेण्याची सूचना नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी स्थायी समितीत केली होती.
चौकट
कोट
मिरज महाविद्यालयाने मायक्रोबायोलाॅजीचे २० विद्यार्थी महानगरपालिकेला कोविड कामासाठी उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय पृथ्वीराज फाउंडेशनचे ९० विद्यार्थीही दोन दिवसांत जोडले जाणार आहे. या सर्वांवर होम आयसोलेशनमधील रुग्णांची देखरेखीची जबाबदारी सोपविली जाईल. हे विद्यार्थी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रासोबत काम करतील. होम आयसोलेशनमधील व्यक्तींची दैनंदिन तपासणी त्यांच्यामार्फत केली जाणार आहे. - नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका.
चौकट
अशी आहे आकडेवारी
गृह विलगीकरणातील एकूण रुग्ण : १११४९
आजअखेर कोरोनामुक्त झालेले रुग्ण : ९५६१
सध्या गृह विलगीकरणातील रुग्ण : १५८८