संतोष भिसेसांगली : दिल्लीत नव्या संसद भवनाच्या (सेंट्रल व्हिस्टा) निमित्ताने ऐतिहासिक प्रकल्पाची उभारणी होत असताना त्याला झळाळी देण्याची कामगिरी सांगलीचा अभियंता करत आहे. नव्या संसदेचा कोपरा न कोपरा प्रकाशमान करण्याचे काम सांगलीकर अधीक्षक अभियंता राहुल कांबळे करत आहेत.राहुल कांबळे २०१६ पासून या प्रकल्पाला जोडले गेले आहेत. सांगलीतील अयोध्यानगर परिसरात राहणाऱ्या राहुल कांबळे यांनी न्यू हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वालचंद महाविद्यालयात विद्युत शाखेतून अभियांत्रिकीची पदविका पूर्ण केली. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदवी घेताना सुवर्णपदक पटकावले. दिल्ली आयआयटीमधून एमटेक पूर्ण केले.आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या जनरल इलेक्ट्रिकल्समध्ये नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेतही वर्षभर राहिले. भारतात प्रशासकीय क्षेत्रात काम करण्याच्या अतीव इच्छेने दिल्ली गाठली. केंद्रीय परीक्षेत उत्तीर्ण होऊन २००२ मध्ये केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झाले. सध्या अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत आहेत.कांबळे यांच्या पत्नी वैशाली लोटे याही उच्चशिक्षित असून, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पूर्ण केल्यावर औषधशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. सध्या दिल्लीत वैद्यकीय महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्तीस आहेत.
विद्युत कामांसाठी कांबळे यांचे नाव प्राधान्याने पुढे आलेसाऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉकसह अनेक अत्यंत महत्त्वाच्या शासकीय इमारतींची विद्युत कामे कांबळे यांनी पार पाडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल व्हिस्टाचा संकल्प केला, तेव्हा विद्युत कामांसाठी कांबळे यांचे नाव प्राधान्याने पुढे आले. दिल्लीतील सरकारी इमारतींच्या कामांचा प्रदीर्घ अनुभव कामी आला. या प्रकल्पावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. सेंट्रल व्हिस्टाचा पहिला टप्पा असलेल्या राजपथाचे लोकार्पण मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केले, तेथील विद्युत कामेही कांबळे यांच्या मार्गदर्शनाखालीच झाली आहेत.
मोदींकडून आठवड्याला आढावा
नव्या संसद भवनातील वातानुकूलन, प्रकाश व्यवस्था, अलार्म, अग्निसुरक्षा, वीज उपकेंद्रे, पथदिवे, उद्याने व कारंजांमधील रोषणाई, भूमिगत वीजवाहिन्या, अखंडित विजेसाठी एक्स्प्रेस फीडर अशी सर्व विद्युत कामे कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक आठवड्याला कामाच्या प्रगतीची माहिती घेतात. गरजेनुरूप सूचना करतात.