सांगली : कोरोनामुळे खासगी प्रयोगशाळांचीही चलती सुरू झाली आहे. कोरोना चाचण्यांसाठी संशयितांची गर्दी होत असून जिल्हाभरात दररोज सुमारे पाच लाखांचा खर्च चाचण्यांसाठी होत आहे. शासकीय रुग्णालयांत चाचणी मोफत होत असली, तरी खासगी प्रयोगशाळांत चाचण्या करणारांचीही संख्या मोठी आहे.
सध्या सुमारे ४० खासगी प्रयोगशाळांत रॅपिड ॲण्टीजेन, तर चार प्रयोगशाळांत आरटीपीसीआर चाचणी होते. ॲण्टीजेनसाठी सरासरी २५० रुपये शुल्क आकारले जाते. आरटीपीसीआरसाठी सरासरी १००० ते १२०० रुपये द्यावे लागतात. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढू लागला, त्यानुसार खासगी प्रयोगशाळेत चाचण्यांची संख्याही वाढली. विशेषत: लोकांचे प्रवास सुरू झाले, तसे खासगी चाचण्यांचे प्रमाण वाढले. शेजारच्या कर्नाटक, गुजरात राज्यांत जाण्यासाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले. कर्नाटक सीमेवर प्रमाणपत्राशिवाय प्रवेश बंद झाला. जिल्ह्याचा कर्नाटकशी दररोजचा संपर्क असल्याने तेथे जाऊ इच्छिणारांसाठी तपासणी करून घ्यायला सुरुवात केली, त्यामुळेही खासगी प्रयोगशाळांत चाचण्यांचे प्रमाण वाढले. शासकीय कर्मचारी यांच्या चाचण्या मात्र शासकीय प्रयोगशाळांतच केल्या जात आहेत. सध्या मिरज कोविड रुग्णालयात एकमेव शासकीय प्रयोगशाळा असून तेथे दररोज सरासरी १००० आरटीपीसीआर व १००० रॅपिड ॲण्टीजेन चाचण्या केल्या जात आहेत. महापालिकेच्या १० आरोग्य केंद्रांत रॅपिड ॲण्टीजेन तपासण्या होतात. आरटीपीसीआरचे नमुने मात्र मिरज कोविड रुग्णालयातूनच तपासून घेतले जातात.
चौकट
आरटीपीसीआरसाठी १२०० रुपये शुल्क
- सुरुवातीला खासगी प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआर चाचणीसाठी २२०० रुपये शुल्क घेण्यास शासनाने मान्यता दिली होती, पण सध्या ते कमी केले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रयोगशाळांत सरासरी १००० ते १२०० रुपये घेतले जातात.
- रॅपिड ॲण्टीजेनसाठी तपासणीही सरासरी २५० रुपयांत करून दिली जाते. प्रवासासाठी प्रमाणपत्र आवश्यक असलेल्यांचा कल या चाचणीकडे आहे.
पॉइंटर्स
अशी आहे सरासरी आकडेवारी
जिल्ह्यात दररोज केल्या जाणा-या चाचण्या- २८००
शासकीय- २०००
खासगी- ८००
प्रयोगशाळांची संख्या
शासकीय ११
खासगी ४५
चौकट
गेल्या आठवडाभरात झालेल्या चाचण्या - १६,०००
- गेल्या आठवडाभरात शासकीय व खासगी मिळून सुमारे १२,००० जणांच्या चाचण्या झाल्या. त्यामध्ये ९९० नवे कोरोनाबाधित निष्पन्न झाले.
- यामध्ये १०,००० आरटीपीसीआर तर ६००० रॅपिड ॲण्टीजेन चाचण्या झाल्या. महापालिकेच्या १० आरोग्य केंद्रांतही ॲण्टीजेन चाचण्या झाल्या.
- खासगी प्रयोगशाळांत दररोज सरासरी ५०० आरटीपीसीआर चाचण्या, तर २५० ॲण्टीजेन चाचण्या झाल्या.