सांगली, दि. 3 : परराज्यातून सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात शस्त्रांची तस्करी करणाºया ‘रॅकेट’चा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी पहाटे यश आले. टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तूल, २७ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सनीदेव प्रभाकर खरात (वय २०, सिंधु-बुद्रूक, दहिवडी, ता. माण, जि. सातारा) व संतोष शिवाजी कुंभार (२७, नागझरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत. ते पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. दोघेही शंभरफुटी रस्त्यावरील हॉटेल ‘जलमल्हार’जवळ पिस्तूल विक्री करण्यास येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती.
या विभागाचे पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने पहाटेपासून सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयित तरुण हातात बॅग घेऊन आले. पथकाला पाहून त्यांना पोलिस असल्याची चाहूल लागली. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडण्यात यश आले. त्यांच्या बॅगेची झडती घेतल्यानंतर देशी बनावटीची सात पिस्तूल व २७ काडतुसे असा साडेतीन लाखांचा माल जप्त सापडला.
संशयित सनीदेव खरात व संतोष कुंभार यांच्याविरुद्ध बेकायदा हत्यार बाळगणे व तस्करीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सांगलीतील गुन्हेगारांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते अगदी सहजपणे येथे आले असावेत.
गुन्हे अन्वेषणचे एक पथक तपासासाठी सातारा जिल्ह्यात रवाना केले आहे. पथकाने संशयितांच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. पण काहीच सापडले नाहीत. सातारासह राज्यात अन्य जिल्ह्यात त्यांच्याविरुद्ध यापूर्वी कारवाई झाली आहे का? याची माहिती घेतली जात आहे.
परराज्यातून तस्करीपोलिसप्रमुख शिंदे म्हणाले, हत्याराची तस्करी करणारे मोठे ‘रॅकेट’ असण्याची शक्यता आहे. सध्या तरी दोघांना अटक केली आहे. त्यांनी ही शस्त्रे कोठून आणली? सांगलीत ते कोणाला विकणार होते? याबद्दल चौकशी सुरु आहे. परराज्यातून त्यांनी शस्त्रे आणली असावीत, असा संशय आहे. त्याअनुषंगाने तपासाला पुढील दिशा देण्यात आली आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आचारसंहिता सुरु आहे. अशा स्थितीत सात पिस्तूल जप्त करण्याची झालेली ही मोठी कारवाई आहे.