सांगली : सुवर्ण व्यवसायावरील एक टक्का अबकारी कर रद्द करावा, या मागणीसाठी सांगलीत सराफ व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला. मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. आंदोलनाच्या पहिल्यादिवशी जिल्ह्यातील सुमारे साडेपाच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सुवर्ण व्यावसायिकांना एक टक्का अबकारी कर लावल्याने देशभरातील सराफ व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. यासंदर्भात महाराष्ट्रात पुकारलेल्या बेमुदत सराफ व्यवसाय बंदच्या आंदोलनास सांगली जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगलीतील मुख्य सराफ पेठेसह शहरातील सर्वच सराफ दुकाने बंद होती. सराफ पेठेत सकाळी व्यावसायिकांनी एकत्र येऊन आंदोलनाबाबत चर्चा केली. नेहमी गजबजलेल्या पेठेत बुधवारी सकाळपासून शांतता होती. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पुढील आंदोलनाबाबत चर्चा केली. यावेळी आ. सुधीर गाडगीळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सराफ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अबकारी कराविषयीचा निर्णय तातडीने मागे घेतला जावा, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी गाडगीळ यांच्याकडे केली. यावेळी गाडगीळ म्हणाले की, सराफ व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत निश्चितपणे चर्चा होईल आणि तोडगासुद्धा निघेल. शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला जाईल. यावेळी महाराष्ट्र सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर पंडित, बाबूराव जोग, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पेंडूरकर, माजी आमदार नितीन शिंदे, पंढरीनाथ माने, विस्तारित सांगली शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल महामुनी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)काय आहे मागणी?केंद्रीय अर्थसंकल्पात सुवर्ण व्यावसायिकांना उलाढालीवर एक टक्का अबकारी कर लावला आहे. या करामुळे कराच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्यापासून विहित नमुन्यात अबकारी कार्यालयात त्याचे चलन करण्यापर्यंत अनेक अतिरिक्त कामे सुवर्ण व्यावसायिकांना करावी लागणार आहे. याशिवाय या करामुळे सोन्याच्या दरात वाढ होऊन त्याचा खरेदीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींमुुळे असोसिएशनने विरोध केला आहे. कोट्यवधीची उलाढाल ठप्पबेमुदत आंदोलनास बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्यादिवशी शहरातील साडेतीन कोटी, तर उर्वरित जिल्ह्यातील सुमारे दोन कोटी अशी सुमारे साडेपाच कोटींची उलाढाल ठप्प झाली.
सांगलीच्या सराफ बाजारात कडकडीत बंद
By admin | Published: March 02, 2016 11:21 PM