सांगली : ग्रामीण भागात शिक्षण होऊनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्या प्रशासकीय सेवेची सुरुवात सांगली जिल्ह्यातून झाली. ज्याप्रमाणे आपल्या पहिल्या शाळेतील संस्कार आयुष्यभर सोबत असतात, अगदी तसेच सेवेची सुरुवात सांगलीतून करताना आलेले अनुभव मला प्रशासकीय सेवा यशस्वी करण्यात उपयोगी ठरल्याचे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त चद्रकांत दळवी यांनी सोमवारी येथे केले.दळवी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित कृतज्ञता गौरव सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना दळवी बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. संजयकाका पाटील होते.दळवी पुढे म्हणाले की, जिथून सेवेची सुरुवात झाली त्याठिकाणचा सत्कार माझ्यासाठी विशेष आहे. सांगलीत सुरुवातीची सेवा करताना आलेल्या अनुभवाच्या जोरावरच ३५ वर्षांची प्रशासकीय वाटचाल झाली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विठ्ठलदाजी पाटील यांच्याकडून खूप काही शिकलो. लोकप्रतिनिधींबरोबरच सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर वाघ, लीना मेहेंदळे, शिवाजीराव पाटील यांच्याकडून प्रशासनातील बारकावे शिकलो आणि आयुष्यभर याचा उपयोग झाला त्यामुळे सांगली माझ्यासाठी कर्मभूमीच आहे.या पहिल्या पिढीबरोबरच माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याइतका संवेदनशील नेता मी पाहिला नाही. राजकारणातील समाजकारणी म्हणूनच त्यांच्याकडे पहावे लागेल. ३५ वर्षांपूर्वीची सांगली व आता या मोठा बदल झाला असून, जिल्ह्यात समृध्दता आली आहे. सेवानिवृत्तीनंतर आता ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे.खा. संजयकाका पाटील म्हणाले की, समाजातील दुर्बल, कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दळवी यांनी काम केले. अनेक अधिकारी कागद पाहून आपले काम करतात; परंतु दळवी यांनी माणसे पारखून काम केल्यामुळे ते यशस्वी झाले. त्यांनी संपूर्ण कारकीर्दीत नौटंकीपणा न करता काम केल्यानेच त्यांचा असा सन्मान होतो आहे.अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी स्वागत केले, तर निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, अश्विनी जिरंगे, धर्मेंद्र पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.आठवणीत रमले दळवीआपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगली जिल्ह्यातील अनेक गावांचा उल्लेख करत तेथील आठवणी सांगितल्या. माजी आ. विठ्ठलदाजी पाटील हे सलगरेहून सकाळी सात वाजताच मिरजेच्या प्रांत कार्यालयात यायचे. कालांतराने त्याची इतकी सवय झाली की, ते आमच्या घरातीलच ज्येष्ठ सदस्य असल्याची भावना निर्माण झाली. आर. आर. आबांसमवेत नाईट कॉलेजला घेतलेला प्रवेश, महात्मा गांधी वसतिगृहात त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, पद्मा टॉकीजचा अनुभव, पुष्पराज चौकात आबांसमवेत रंगलेल्या गप्पांचा फड अशा अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.अन् दळवींच्या डोळ्यात आले पाणीदळवी यांनी आपल्या मनोगताच्या सुरुवातीला आपल्या गावातील शाळेचा अनुभव सांगत त्यावेळी सांगली जिल्ह्यातील लवटे सर, साळुंखे सर अध्यापनास होते, असे सांगितले. त्यातील लवटे सर येथे उपस्थित असून, मी त्यांचा सत्कार करणे अपेक्षित असताना आज त्यांनी मला अंगठी देऊन माझा सत्कार केल्याचे सांगताना दळवी यांना अश्रू अनावर झाले.सांगलीत सोमवारी माजी विभागीय आयुक्त चद्रकांत दळवी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सतार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून धर्मेंद्र पवार, अभिजित राऊत, सुहेल शर्मा, विजयकुमार काळम-पाटील, खा. संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते.
सांगलीतील अनुभवामुळेच कारकीर्द यशस्वी : चंद्रकांत दळवी-सांगलीत गौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:23 PM
सांगली : ग्रामीण भागात शिक्षण होऊनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्या प्रशासकीय सेवेची सुरुवात सांगली जिल्ह्यातून
ठळक मुद्देआर. आर. पाटील यांच्या आठवणींना दिला उजाळा