स्त्रीने मनात आणले तर ती तिच्या आवडीच्या क्षेत्रातही यशस्वी उद्योजिका होऊ शकते, हे शरयू सुनील पवार यांनी दाखवून दिले आहे. नोकरीच्या मागे न धावता कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आणि आवडीचे रूपांतर व्यवसायात करून त्यांनी अल्पावधित यशस्वी उद्योजिका म्हणून नाव कमावले आहे. सांगलीची ‘मसाला क्विन’ अशी जिल्ह्यात त्यांची ओळख होत आहे. गरजू दहा महिलांना त्यांनी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
माहेरी असताना वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत वेगवेगळ्या भागामध्ये शरयू पवार यांना जावे लागत असे. त्या-त्या भागातील वेगवेगळे पदार्थ, त्यांची चव आणि ते करण्याची पद्धत हे सगळे जवळून त्यांना पाहता आले. आई तर सुगरणच. तिच्याकडून मिळालेला वारसा आणि नवनवे प्रयोग करण्याची आवड असल्यामुळे त्यांनी स्वत:ची कंपनी स्थापन करून मसाले बनविण्याचा विचार केला. चार ते पाच वर्षे व्यावसायिक गोष्टींची माहिती घेऊन, अभ्यास करून २०१२ मध्ये त्यांनी मसाल्यांची कंपनी घरीच सुरू केली. त्याअंतर्गत त्यांनी स्वत:च्या ब्रँडने मसाले बनवून बाजारात आणले. शाकाहारी-मांसाहारी असे २१ प्रकारचे मसाले त्या स्वत: बनवतात.सध्या त्यांच्याकडे दहा महिला काम करतात. प्रत्येक मसाला स्वत:च्या निरीक्षणाखाली बनविण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. मसाल्यासाठी लागणारा सर्व कच्चा माल त्या स्वत: जातीने त्या त्या भागात जाऊन खरेदी करतात. सर्वच मसाल्यांचा दर्जा उत्कृष्ट राखण्यावर त्यांचा भर असतो. प्रत्येक मसाल्याचे फॉर्म्युले बनविण्यासाठी ४-५ वर्षे गेली. त्या मसाल्यांचे पदार्थ बनवून ते ‘टेस्टिंग’साठी पाठवले जात आणि त्यानंतर आलेल्या सूचनेनुसार, आवडीनुसार बदल करण्यात आले. आज प्रत्येक मसाल्याचे वेगळेपण त्यांनी जपले आहे. मसाले वापरण्याची पद्धतही सोपी आहे.
शरयू पवार यांनी मसाल्याबरोबरच चकली भाजणी, थालीपीठ भाजणीही सुरू केली आहे. साखरेचा त्रास असलेल्या (मधुमेही) लोकांसाठी त्यांनी खपली गव्हाच्या रव्यापासून बनविण्यात येणारे विविध पदार्थ बनविले आहेत. त्यांच्या मसाल्यांना, पदार्थांना सांगली, मिरजेतच नव्हे, तर पुणे, मुंबई येथील चोखंदळ ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.त्यांना घरच्यांचा विशेषत: पतीचा मोठा पाठिंबा आहे. मसाल्यांमध्ये बºयापैकी यश मिळाल्यानंतर त्यांनी मसाल्याची चव प्रत्येकाने चाखावी, या दृष्टीने सांगलीमध्ये सर्व सोयीनींयुक्त अशा ‘फूड ट्रक’ची संकल्पनाही अमलात आणली. त्यानुसार रोज सायंकाळी ७ ते १० या कालावधित विविध मांसाहारी पदार्थ ‘पॅक’ करून विकण्यात येतात. त्यांच्या या प्रयोगालाही सांगलीतील खवैय्यांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे.मसाल्याबरोबरच रोजचा ‘फूड ट्रक’चा स्वयंपाकही शरयू स्वत: लक्ष देऊन बनवितात. काम करणाºया महिलांचे आरोग्य, स्वच्छता, मानसिकता त्यांचे शारीरिक कष्ट याचा विचार त्या करताना दिसतात. काम करणाºया महिलांच्या हुशार मुलांना शैक्षणिक मदत म्हणून त्यांना शैक्षणिक दत्तक घेण्याचा त्यांचा विचार आहे.त्यांना पुष्परचना स्पर्धा, पाककला स्पर्धांमध्येही आवड आहे. त्यासाठी त्या आवर्जून वेळ काढतात, सहभागीही होतात. प्रत्येक स्पर्धेत पारितोषिकही मिळवतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन स्थानिक पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला आहे. नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असलेल्या शरयू पवार यांनी घन:श्यामनगरमधील महिलांना संघटित करुन २००८-०९ मध्ये महिला मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या माध्यमातून वर्षभरातील प्रत्येक सण-उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक महिलांना संधी मिळावी म्हणून दरवर्षी पदाधिकाºयांच्या निवडी करुन त्यांच्याकडे मंडळाचा कारभार सोपवला जातो. मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम सुरू असतात. स्त्री काय काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरयू पवार.मसाल्याचे ‘गिफ्ट हॅँपर’ देण्याची इच्छानाम फाऊंडेशनअंतर्गत लग्न होऊन जाणाºया मुलींना सहा महिने पुरतील असे मसाल्याचे ‘गिफ्ट हॅँपर’ देण्याची त्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. सियाचीनसारख्या ठिकाणी असणाºया सैनिकांना ‘हायजेनिक पॅक फूड’ त्यातही प्रामुख्याने खपली गव्हाच्या रव्यापासून बनविण्यात येणाºया पदार्थांचा समावेश करून पाठविण्याचा त्यांचा संकल्प आहे. यातूनच त्यांच्यामध्ये असलेल्या सामाजिक जाणिवेचेही दर्शन घडून येते. सांगलीसह ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीलाही त्या नेहमीच धावताना दिसत आहेत.’ अशोक डोंबाळे, सांगली