सांगली : जिल्ह्याचा पारा आता विक्रमाच्या दिशेने धावत असून, बुधवारी सांगली जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. येत्या दोन दिवसात पारा ४३ अंशावर जाणार असून, १९७३ च्या विक्रमाची बरोबरी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. सांगली जिल्ह्याचे एप्रिल महिन्यातील सरासरी कमाल तापमान आजवर ३८.२ अंश सेल्सिअस राहिले आहे. या सरासरी तापमानापेक्षा यंदाच्या एप्रिलमध्ये वाढ होताना दिसत आहे. आजवर एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान १९७३ मध्ये ४३ अंश नोंदले गेले. जिल्ह्याच्या तापमानाची ही सीमारेषा आहे. यावर्षी ही सीमारेषा ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार २१ ते २३ एप्रिल या कालावधित सांगली जिल्ह्याचे तापमान ४३ अंशापर्यंत किंवा त्यापुढे जाणार आहे. किमान तापमानही २५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची चिन्हे आहेत. आजवरचा एप्रिल महिन्याचे सरासरी किमान तापमान २१.२ इतके राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात तीन अंशाने वाढ दिसत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधित उन्हाच्या तीव्र झळांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी रस्त्यावर अघोषित आचारसंहितेचे चित्र दिसू लागले आहे. रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात पारा ४२ ते ४३ अंशाच्या घरात राहणार आहे. या कालावधित पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सतर्कतेचा आठवडाचालू आठवड्यात २ ते २५ एप्रिलपर्यंत विक्रमी तापमानाची शक्यता असल्याने नागरिकांना अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. तीव्र उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शासकीय पातळीवर उष्माघातापासून बचावासाठी जनजागृती सुरू आहे.
सांगलीचा पारा ४२ अंशांवर
By admin | Published: April 20, 2017 12:07 AM