सांगली : जिल्ह्यातील थंडीचा कहर सुरूच असून, बुधवारी येथील किमान तापमान ८.९ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. गेल्या दहा वर्षांतील हे दुसरे नीचांकी तापमान असून, येत्या तीन दिवसात पारा आणखी खाली जाण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.सांगली जिल्ह्यात यंदा थंडीने कहर केला असून, अनेक विक्रम मोडीत काढत पारा झपाट्याने खाली जात आहे. कमाल तापमानात अंशाने वाढ झाली असली तरी, किमान तापमानाचा पारा ८.९ अंशापर्यंत खाली घसरला. मंगळवारी किमान तापमान ९.४ अंश इतके नोंदले गेले होते.गेल्या दहा वर्षांचा जानेवारी महिन्यातील सांगली जिल्ह्याच्या तापमानाचा आढावा घेतल्यास केवळ १० जानेवारी २०१५ रोजी पारा ८.४ अंशापर्यंत खाली आला होता. मागील दहा वर्षांत २0१५ चा अपवाद वगळता कधीही पारा ९.५ अंशाच्या खाली आला नव्हता.
दहा वर्षातील दुसरी नीचांकी तापमानाची नोंद होत असून, येत्या दोन दिवसात थंडीचा २०१५ चा विक्रमही मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. थंडीचा हा कहर लोकांच्या आरोग्यावर परिणाम करीत आहे. त्यामुळे लोकांनी थंडीबाबत अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.रात्री आणि पहाटेच्यावेळी थंडी अधिक तीव्र होताना दिसत आहे. गत आठवड्यात दिवसाही थंडीची तीव्रता जाणवत होती. गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात दोन अंशाने वाढ झाल्याने दिवसा असणारी थंडीची तीव्रता कमी झाली आहे.
थंडीच्या लाटेमुळे शालेय विद्यार्थी, शेतमजूर व पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. थंडी वाढत असल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्याही अचानक घटल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आगामी तीन दिवस पारा ९ अंश किंवा त्याखाली जाण्याची शक्यता आहे. कमाल तापमानातही ४ जानेवारीनंतर घट होणार असल्याने पुन्हा दिवसाच्या थंडीची तीव्रता वाढणार आहे.