सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील यांनी शनिवारी दुपारी स्विकारले. शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. एकीकडे खाकी वर्दीतील सैतानांनी अनिकेतचा खून केला; पण याच खार्की वर्दीतील सुजाता पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळेला लुटमारीच्या गुन्ह्यात अटक केली. गुन्हा कबूल करण्यासाठी त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता.
याप्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजण अटकेत आहेत. अनिकेतला प्रांजल ही तीन वर्षाची मुलगी आहे. पित्याचे छत्र हरपल्याने ती पोरकी झाली आहे. राज्य शासनाने कोथळे कुटुंबास दहा लाखांची मदत केली.
आरोपींना अटक झाली. त्यांना शिक्षा होईल; पण अनिकेतचे कुटुंब व मुलीचे काय? त्यांनी जगायचं कसं? असा प्रश्न होता. त्याचवेळी हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी प्रांजलचे पालकत्व स्वीकारण्यास पुढाकार घेतला. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे त्यांनी परवानगीही मागितली होती.शनिवारी दुपारी सुजाता पाटील संपूर्ण कुटूंबासह सांगलीत दाखल झाल्या. त्यांनी कोथळे कुटूंबाची भेट घेतली. अनिकेतची पत्नी व आईकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. प्रांजलला कडेवर उचलून घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारारांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या, अनिकेतच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटूंबाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनिकेतची पत्नी, आई व मुलगी रस्त्यावर आली आहे. त्यांना कुठेही काहीही कमी पडू नये. पैशाअभावी मुलीची फरफट होऊ नये, शिक्षणापासून ती वंचित राहू नये, यासाठी मी तिचे पालककत्व स्विकारले आहे. तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च उचलणार आहे.
महिन्यालाही काही रक्कम खर्चासाठी देणार आहे. अनिकेती पत्नी संध्या ही माझी लहान बहिण म्हणून मी तिला सर्वतोपरी मदत करेन. माझे चिखली (जि. कोल्हापूर) सासर आहे. अधून-मधून मी प्रांजलची भेट घेण्यास येईन.
२५ हजाराची मदतसुजाता पाटील यानी अनिकेतची पत्नी संध्या यांना २५ हजाराचा धनादेश दिला. ही रक्कम तिला काही अडचण निर्माण झाल्या ती कधीही शकते.